विभूतवाडीत अज्ञात चोरट्याने किराणा दुकान फोडले

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथे अज्ञात चोरट्याने किराणा दुकान फोडून सिगारेटचे बॉक्स व रोख रक्कम असा ३१ हजार शंभर रुपयाचा माल लंपास केला आहे. याबाबतची फिर्याद प्रकाश भिमराव पावणे यांनी आटपाडी पोलिसात दिली आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रकाश भिमराव पावणे यांचे विभूतवाडी गावात स्टँडवर चारही बाजूने पत्रे असलेले बिरुदेव किराणा जनरल स्टोअर्स नावाचे किराणा दुकान आहे. १ एप्रिल रोजी रात्री १० वाजता ते २ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्या दुकानाचा पत्रा उचकटून दुकानातील नऊ हजार रुपये किमतीचे गोल्ड फ्लेक कंपनीचे सिगारेटचे दोन बॉक्स, तीन हजार रुपये किमतीचे ब्रिस्टल कंपनीचे सिगारेटचे एक बॉक्स, ३ हजार २०० रुपये किमतीचे क्लासिक कंपनीचा सिगारेटचा एक बॉक्स, १ हजार ८०० रुपये किमतीच्या फोर स्क्वेअर कंपनीच्या सिगारेटचा एक बॉक्स, ३ हजार २०० रुपये किमतीचा गरम सिगारेट एक बॉक्स, ३ हजार २०० रुपये किमतीचा ब्लॅक सिगारेटचा एक बॉक्स, ३ हजार २०० रुपये किमतीचे गोल्ड फ्लेक कंपनीचे सिगारेटचा एक बॉक्स तसेच ४ हजार ५०० रुपये रोख रक्कम असे मिळून ३१ हजार १०० रुपयेचे साहित्य व रोख रक्कम चोरून नेले आहेत. याबाबतची फिर्याद किराणा दुकानदार प्रकाश पावणे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल वगरे करीत आहेत.