खमक्या नेतृत्वाचा चिरंतर आदर्श:स्व.धुळाजीराव झिंबल

गोरगरिबांच्या सेवेचे व्रत, विश्वासू राजकारण, संपन्न अनुभव आणि गाढा अभ्यास यासारख्या गुणांनी समृद्ध असणाऱ्या धुळाजीराव झिंबल यांनी तालुक्याच्या राजकारणात राजकारण्यांना विविध अंगाने सकारात्मक राजकारण करण्याचा आदर्श घालून दिला आहे. त्यांचे कार्य डोळ्यात अंजन घालणारे ठरले आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा लेखन प्रपंच…


श्री.धुळाजीराव मारुती झिंबल यांचा जन्म लिंगीवरे ता. आटपाडी जि. सांगली या गावी ५ जुलै, १९२७ रोजी सर्वसामान्य धनगर कुटुंबात झाला. त्यांचे बालपण हलाखीचे गेले. जन्माला जरी सामान्य म्हणून आले तरी त्यांनी असामान्य कार्य करून ते तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या गळ्यातील ताईत बनले.
राजकारण व समाजकारणात पदार्पण करण्यापूर्वी धुळाजीराव झिंबल यांना नेता घडवण्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती व पार्श्वभूमी कारणीभूत ठरली. तत्कालीन परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी मातीकाम, सरकारी ब्रासची कामे, ताली घालणे यासारखी रोजगार हमीची कामे करण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. स्वतः कष्ट करत असताना ते इतरांना कष्ट करताना व जीवन व्यतीत करताना होणाऱ्या वेदनांची जाणीव पदोपदी आपल्या काळजात साठवत असत. अशावेळी दीनदुबळ्या लोकांना त्यांच्या गरजा ओळखून मदतीचा हात पुढे करण्यात ते सदैव अग्रेसर राहत होते.या त्यांच्या गुणकौशल्यामुळे लोकांनी त्यांना आपला ‘नायक’ म्हणून निवड केली. प्रत्येक कष्टकरी बांधवांच्या अडीअडचणी, वेदना ते जाणून घेत असल्यामुळे सर्वांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीची भावना दृढ होऊ लागली. अशा लोकांचे नेतृत्व करण्याचा गुण अंगी उतरला आणि रोजगार हमीच्या व अन्य सरकारी कामाचे ते ‘मुकादम’ झाले. सर्वांना आपल्या कामाच्या मापानुसार योग्य मोबदला देण्याचा त्यांच्या कष्टाचे चीज करण्याचा अट्टहास ते नेहमी करत असत.कोणताही जीव अन्यायाला बळी पडणार नाही याबाबत ते सदैव सतर्क असायचे. श्रमाची पूजा करणाऱ्या गोरगरिबांविषयी त्यांना सदैव कळवळा वाटत असे.
श्रमजीवी लोकांचे नेतृत्व करीत असतानाच त्यांनी १९६० साली राजकारणात प्रवेश केला. गावातील लोकांचे प्रश्न ते जातीने समजावून घेत असत व त्या प्रश्नांना वाचा फोडत असत गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात ते अंत:करणापासून एकरूप होत असत. त्यामुळे गावातील लोकांबरोबरच राजकारण्यांनाही त्यांच्याविषयी आत्मीयता वाटू लागली. यातूनच लिंगीवरे गावचे सरपंच होण्याचा मान मिळवला. सरपंच पदाची संधी त्यांनी सोन्याहून मौल्यवान करण्याची धडपड सुरू केली. सरपंच पदाच्या कारकिर्दीत त्यांनी गावातील लोकांची व गावाची विकासकामे करण्याचा धडाका लावला. ही कामे करीत असताना लोकांची तालुक्यातील व अन्य प्रकारचे कामे करण्याची व्याप्ती वाढली. आपल्या कारकिर्दीचा परीघ वाढवण्यासाठी त्यांना ही आणखी संधी खूणवीत होती. त्याचा त्यांनी अचूक वेध घेतला. गोरगरिबांच्या सुखदुःखात मिसळण्याची वृत्ती, रोजगार हमीच्या कामातून परिसरातील लोकांशी जोडली गेलेली नाळ आणि तालुक्यातील लोकांना वाटणारी आपुलकी यासारख्या बाबींनी त्यांना तालुक्याच्या राजकारणात पाऊल टाकण्यास भाग पाडले. आटपाडी पंचायत समितीच्या निवडणुकीत गणातून निवडून येऊन तालुक्याचे दुसरे सभापती होण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यावेळी त्यांनी मोठा संघर्ष करावा लागला. या कामी त्यांना अनेक सग्यासोयऱ्यांची मदत लाभली. संघर्ष करून प्राप्त झालेला सभापती पदाच्या काटेरी मुकुट त्यांनी आपल्या खुबीने समर्थपणे नुसता पेललाच नाही तर त्यांनी त्या मुकुटाला सोनेरी मुकुटाचे वैभव चिरंकार प्राप्त करून दिले. २० जून,१९७९ ते ३० सप्टेंबर, १९८२ या सव्वातीन वर्षाच्या सभापतीपदाच्या कालखंडात त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली.


सभापती पदाची संधी मिळाल्यानंतर मात्र त्यांनी राजकारणात व समाजकार्यात मागे वळून कधी पाहिलेच नाही. आपल्या कार्यकुशल छबीने ते गोरगरीब व तालुकावाशियांच्या गळ्यातील ताईत बनले.पंचायत समितीसह इतर कामांसाठी गावा-गावातून येणाऱ्या लोकांची ते जातीने विचारपूस करीत असत. गोरगरीब, दुर्बल लोकांच्या तिकिटाचे पैसे, त्यांचे जेवण-खाणे यासारख्या बारीक-सारीक गोष्टी ते आवर्जून जाणून घेत असत. कामासाठी येणाऱ्या लोकांना ते खिशातील पैसा, वेळप्रसंगी स्वतःचे वेळप्रसंगी चटणी-भाकरीचे जेवण भरवून ते आस्थेने काम करीत असत. तसेच पंचायत समितीच्या व शासनाच्या विविध योजना ते गोरगरिबांच्या पदरी पाडत असत. यामुळे त्यांची लोकप्रियता वाढतच राहिली.हीच वाढती लोकप्रियता त्यांना जिल्हा परिषदेवर घेऊन गेली.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात शरीरयष्टीने साधारण असणारी ही लहान मूर्ती अनुभव व अभ्यासाने महान कीर्ती करू लागली. सभागृहात अतिशय समर्पकपणे, पूर्ण अभ्यासाने व सद्सद्विवेक बुद्धीने ते आपला मुद्दा मांडत असायचे. कामाच्या वास्तव माहितीची त्याला किनार असायची. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर अनेकजणांना घाम फुटायचा.कामकरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रश्नाची मात्र आस्था असायची.


जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे ते आपले वाटायचे. संपर्कातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची ते अंत:करणापासून कणव करीत असे. परंतु अभ्यासू वृत्तीमुळे त्यांच्याविषयी मात्र आदरयुक्त दबदबाही होता. सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची भोजनाची, निवासाची विचारपूस करून घरी आलेल्या लोकांना जेवणाशिवाय कधीही ते परत पाठवत नसत, अशी त्यांनी ख्याती निर्माण केली होती.
स्वतःसाठी व वैयक्तिक कामासाठी त्यांनी कोणत्याही शासकीय मालमत्तेचा वैयक्तिकरित्या कधीही वापर केला नाही. सभापती असताना फक्त महत्त्वाच्या शासकीय कामासाठीच ते वाहनाचा वापर करीत असायचे. पदोपदी शासनाच्या मालमत्तेचा वापर करणाऱ्यांना त्यांनी हा वर्षानुवर्षे आदर्श घालून दिला आहे.
गावागावात दळणवळणाची, वाहनाची व एसटी बसची सोय व्हावी म्हणून ते पदरमोड करीत असत. सांगली-राजेवाडी ही मुक्कामी गाडी नव्याने सुरुवात करताना त्यांनी ठराविक प्रवासी प्रवास करण्याचा उद्दिष्टाचा आकडा पूर्ण व्हावा, म्हणून स्वतः लोकांची तिकिटे काढून प्रवासी लोकांची ने-आण करीत असत. कामासाठी जाताना ज्यांचे काम आहे,त्याची तिकीट काढणे, स्वतः जवळची भाजी भाकरी खाऊ घालणे हा त्यांनी सर्व नेतेगिरी करणाऱ्यांना आदर्श घालून दिला.


आटपाडी तालुका हा दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर पडत नाही. पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा लोकांपुढे गंभीर प्रश्न आहे. शेतीही पावसावर अवलंबून असल्यामुळे व पावसाची वारंवार हुलकावणी मिळत असल्यामुळे कायमस्वरूपी सिंचन योजनेशिवाय तालुक्याला पाणी मिळणार नाही. म्हणून त्यांनी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी या भल्या माणसाला तालुक्यात पाचारण करून पाण्यासाठी संघर्षाची ठिणगी पेटवली. नागनाथअण्णा नायकवडी, लोकनेते भाई गणपतराव देशमुख यांच्या साथीने पाण्यासाठी संघर्ष करण्याचा मार्ग अवलंबला. संघर्ष केल्याशिवाय पाणी मिळणार नाही आणि पाणी मिळाल्याशिवाय तालुक्यातील गोरगरीब जनता व त्यांच्या मुला-बाळांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार नाही, म्हणून गावा-गावात, तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागामध्ये संघटनासाठी सभा,बैठका,मेळावे घेण्याचा धडाका सुरू केला. पाण्याच्या हक्काविषयी जनजागृती सुरू केली. १९९२ मध्ये पहिली पाणी परिषद यशस्वी केली. साराबंदी, रास्ता रोको आंदोलन, मानवी साखळी करून उठाव केला. पाण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी लढत असतानाच २० मार्च १९९४ रोजी या द्रष्ट्या नेत्यावर काळाने झडप घातली.पाणी संघर्ष चळवळीचा नागनाथ अण्णा नायकवडी यांचा तालुक्यातील कणाच मोडला.


लोकांची सेवा करण्याची वृत्ती, विश्वासू राजकारण, गोरगरिबांविषयी कळवळा ही त्यांची राजकारणाची व समाजकारणाची मौल्यवान खुबी होती. म्हणूनच ते तालुक्यातील प्रत्येक गोरगरीब जनतेच्या गळ्यातील ताईत म्हणून अजरामर झाले. साधी राहणी, उच्च विचार हे त्यांच्या कर्तृत्वाचे सूत्र होते. त्यांच्या निधनाने तालुक्यातील काँग्रेसचा कणा मात्र निश्चितच मोडल्याची जाणीव सर्वांना अनुभवायला मिळाली.


‘यार्ड स्टिक’ म्हणून ओळख
धुळाजीराव झिंबल यांनी लिंगीवरे येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा माणगंगा नदीवर व्हावा म्हणून वर्षानुवर्षे संघर्ष केला. बंधाऱ्याच्या मंजुरीसाठी मापदंड (यार्ड स्टिक)ची अडचण येत होती. प्रत्येक वेळी मापदंडासाठी मार्ग काढण्याचा त्यांचा आग्रह असायचा.वर्षानुवर्षे हीच अडचण व पुन्हा प्रश्नाचा पाठपुरावा करताना त्यांना ‘यार्ड स्टीक’ म्हणून ओळख पडली होती, एवढा बंधाऱ्याचा प्रश्न त्यांनी जिव्हाळ्याने हाताळला होता. त्यांच्या निधनानंतर त्या बंधार्‍याचे काम पूर्ण झाले. त्यांनाही ती श्रद्धांजलीच ठरली आहे.


अन् आठवणीने लोक ढाळतात अश्रू!
धुळाजीराव झिंबल यांनी सभापती पदाला कायमची प्रतिष्ठा मिळवून दिली.आटपाडी तालुक्यातील ‘सभापती’ म्हणून त्या काळापासून आजही बुजुर्ग लोक त्यांना ओळखतात. लोकांनी त्यांचा अनुभव घेतलेले बुजुर्ग आजही त्यांचे नाव घेतल्यास ‘सभापती’ म्हणून संबोधतात व त्यांच्या आठवणींनी अश्रू ढाळतात.


सौ.जयश्री जनार्धन झिंबल
मुख्याध्यापिका, श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालय,लिंगीवरे
शब्दांकन
लक्ष्मणराव खटके