विठ्ठलापुरात घरफोडी करणारा आरोपी मुलगा ताब्यात

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील विठलापूर गावच्या हद्दीतील भवानीनगर येथील ७५ वर्षीय महिलेच्या राहत्या घराचे कुलूप तोडून पेटीतील सोन्याची बोरमाळ व रोख आठ हजार रुपये चोरून नेलेल्या हनुमंत नाथा बाड या मुलास पोलिसांनी ताब्यात घेऊन सोन्याची बोरमाळ जप्त केली.


घटनेबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बबाबाई नाथा बाड (वय ७५ रा. भवानीनगर, विठ्ठलापूर ता.आटपाडी) या त्यांच्या घरास कुलूप लावून शेळ्या चारण्यासाठी १३ फेब्रुवारी रोजी रानात गेल्या असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरामध्ये असलेल्या पत्र्याच्या पेटीचे कुलूप तोडून त्यातील सात ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ व रोख आठ हजार रुपये चोरून नेले होते.याबाबतची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती.


पोलीस हवालदार सोमनाथ पाटील यांनी घरपोडीच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढून हा गुन्हा त्यांच्याच शेजारी राहणारा हनुमंत नाथा बाड हा त्यांचा मुलगा यानेच केल्याची खात्री झाल्यानंतर त्यास ताब्यात घेऊन दोन पंचा समक्ष त्याची झडती घेतली. त्याच्या पॅन्टच्या खिशात चोरीस गेलेली सोन्याची बोरमाळ मिळून आली. त्याबाबत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.


उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस हवालदार सोमनाथ पाटील,जाधव, मोरे व देशमुखे यांनी ही कारवाई केली.