आटपाडी तहसीलमधील लिपीक बागवान लाचलुचपतच्या जाळ्यात

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक महेबूब नबिलाल बागवान यास तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ पकडण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चॅप्टर केसची सुनावणी निवासी नायब तहसीलदार आटपाडी यांच्या समक्ष सुरू आहे.या सुनावणीमध्ये वरिष्ठांना सांगून चॅप्टर केसमध्ये पर्सनल बॉण्डवर सोडण्यासाठी व चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी चॅप्टर केस टेबलचे काम पाहणारा महसूल सहाय्यक महेबूब नबिलाल बागवान (रा.दत्तनगर, मज्जित समोर, आटपाडी, मूळ रा. लोहारा बुद्रुक इंदिरानगर जि. उस्मानाबाद) याने स्वतः करिता पाच हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रार अर्ज काल दि. २० फेब्रुवारी रोजी अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. २० फेब्रुवारी रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता बागवान याने तक्रारदारास चॅप्टर केसमध्ये पर्सनल बॉण्डवर सोडण्यासाठी चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपये लाचेची मागणी करून तीन हजार रुपये दोन दिवसात आणून देण्यास सांगितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.


त्यानंतर आज बागवान याच्याविरुद्ध तहसील कार्यालय आटपाडीच्या आवारात सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून तीन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असताना त्यास रंगेहात पकडण्यात आले.
त्याअनुषंगाने बागवान याच्याविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो सांगलीचे उप अधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार धनंजय खाडे,प्रीतम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, सलीम मकानदार, राधिका माने, ऋषिकेश बडणीकर अतुल मोरे, सुदर्शन पाटील, चालक अनिस वंटमुरे यांनी ही कारवाई केली.


लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0233/2373095 या क्रमांकावर तसेच हेल्पलाइन क्रमांक 1064 वर, व्हाट्सअप क्रमांक ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर 9821880737 तसेच विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.