बेपत्ता दोन्हीही चिमुकल्यांचे मृतदेह आढळले घराजवळच विहिरीत!

पत्नी दवाखान्यात ऍडमिट, दोन चिमुकले बेपत्ता! दोन्हीचेही मृत्यू आढळले नजीकच्या विहिरीत!
शेतमजुरांवर काळाचा दुर्दैवी डाव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत तालुक्यातील अमृतवाडी येथील तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्यांचा मृतदेह घराजवळील विहिरीत पाण्यावर तरंगताना आज (दि.१२) दुपारी आढळून आला. सुलोचना आनंदा गवळी (वय ४) आणि इंद्रजीत आनंदा गवळी (वय ३) अशी सख्ख्या बहिणभावाचे नाव आहे. या दोघांचे मृतदेह दुपारी अमृतवाडी येथील एका विहिरीत आढळून आले. गुरूवारी (दि.९) जत पोलिसांत या दोघांचे अपहरण झाल्याची नोंद करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, जत येथील द्राक्ष बागायतदार दीपक हत्ती यांच्या शेतात खीरमानी (ता. सुरगाण, जि. नाशिक) येथीस दाम्पत्य कामासाठी राहतात. पत्नी आजारी असल्याने तिला रूग्णालयात दाखल केले होते. त्यांची चार मुले घरीच होती. त्य़ांचे वडील घरी आले असता दोन मुले झोपली होती. दोन मुले घरी नसल्याचे आढळले. त्यांचा शोध घेतला असता ती मिळून आली नाहीत. त्यानंतर जत पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी शोध मोहीम राबवली. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे अमृतवाडी येथे तळ ठोकून होते. दरम्यान, आज दुपारी दोन मुलांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.