पत्रकारावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आटपाडीत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या पत्रकारांचे निवेदन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुका प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकार यांच्याकडून आज आटपाडी पोलीस स्टेशनला सर्व पत्रकारांनी निवेदन देऊन निषेध नोंदविला. सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे.या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे.महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्रा थार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली.अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे.. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या घटल्याची सुनावणी फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे.राज्यातील पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत. राज्यात गेल्या आठ दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या आहेत. हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी आमची विनंती या निवेदनातून करण्यात आलेली आहे. तसेच राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्यादृष्टीनं भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी आमची विनंती या निवेदांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या वेळेस पत्रकार, प्रशांत देशमुख, अशोक पवार, सदाशिव पुकाळे, शिवानंद क्षीरसागर, राजू शेख,दादासो वाक्षे, प्रसाद कडव आदी उपस्थित पत्रकार होते