बलात्कारप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेप!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
गांधीनगर

शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.त्यास न्यायालयाने सोमवार दि. ३० जानेवारी रोजी दोन बहिणींवरील बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. यानंतर आज त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आसारामविरोधात २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.
सुरत येथील महिलेने केला होता बलात्काराचा आरोप
अहमदाबादच्या चांदखेडा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती.आसारामने २००१ ते २००६ दरम्यान महिलेवर अनेकवेळा बलात्कार केला. ती शहराबाहेरील आश्रमात राहत होती. ऑक्टोबर २०१३ मध्ये सूरत येथील एका महिलेने आसाराम आणि इतर सात जणांविरुद्ध बलात्कार आणि बेकायदेशीर कैदेत ठेवल्याचा आरोप केला होता. खटला सुरू असताना एका आरोपीचा मृत्यू झाला. जुलै २०१४ मध्ये याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
आसाराम बापू हा सध्या राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात बलात्काराच्या आणखी एका प्रकरणात शिक्षा भोगत आहे.
पीडितेच्या लहान बहिणीवर आसारामचा मुलगा नारायण साई याने बलात्कार करून तिला बेकायदेशीरपणे डांबून ठेवले होते.२०१३ मध्ये त्याच्यावर नोंदवलेल्या बलात्काराच्या प्रकरणात एप्रिल २०१९ मध्ये साईला सुरतच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
बलात्कार प्रकरणात आधीच शिक्षा भोगत आहे आसाराम
आसाराम सध्या जोधपूरच्या तुरुंगात आहे. २०१८ मध्ये जोधपूर न्यायालयाने आसारामला दुसऱ्या एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २०१३ मध्ये जोधपूरच्या आश्रमात १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता. त्यावेळी जोधपूर न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान, देशभरात आसारामचे ४०० पेक्षा जास्त आश्रम आणि ४० शाळा आहेत. आता हे संपूर्ण जाळे आसारामची मुलगी भारती हिच्या हाती आहे. आसारामच्या अटकेननंतर आसाराम बापूच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत असल्याचे समजते.’संत श्री आसारामजी ट्रस्ट’ची धर्मादाय संस्था म्हणून नोंद आहे.