
आटपाडी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
व्ही एच एस ट्रेडर्स एलएलपी या कंपनीचे संचालक/ प्रोप्रायटर यांनी गिरीश कोठावळे यांना कंपनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून दरमहा दहा टक्के परतावा देत असल्याचे सांगून कंपनीत एक कोटी 18 लाख 95 हजार रुपये रोख व बँक खातेद्वारे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून रक्कम परत न केल्याप्रकरणी संदीप धोंडीराम ढेंबरे, संतोष धोंडीराम ढेंबरे, विनोद दादासो कदम, हारुण इस्माईल तांबोळी (सर्व रा. आटपाडी) यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी येथील ग दि मा पार्कमधील व्ही एच एस ट्रेडर्स एल एल पी या कंपनीच्या ऑफिसमध्ये कंपनीचे संचालक/ प्रोप्रायटर यांनी गिरीश सुकुमार कोठावळे रा. कवठेमंकाळ यांना व्ही एच एस ट्रेडर्स एल एल पी ही कंपनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून गुंतवणूकदारांना दरमहा दहा टक्के परतावा देत असल्याचे सांगून त्यांच्या कंपनीत एक कोटी १८ लाख ९५ हजार रुपये रोख व बँक खात्या द्वारे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या गुंतवणूक रकमेच्या सुरक्षेपोटी बँक खात्याचे एक कोटी रुपये रकमेचे चेक व तीन लाख रुपये रक्कम भरण्याची पावती दिली. तसेच गुंतवणूक रकमेच्या परताव्याबाबत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कोणताही परतावा न देता विश्वासघात करून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच रोहन रामलिंग पाटणे रा.आटपाडी यांची तीन लाख ६० हजार रुपये व अमर महारुद्र हेकणे यांची चार लाख ७५ हजार रुपये अशा मिळून नऊ लाख रुपये गुंतवणूक करून त्यातील त्यांना ६५ हजार रुपये रक्कम परतावा देऊन त्यांची उर्वरित रक्कम आठ लाख ३५ हजार रुपये परत न करता तिघांची मिळून एक कोटी २७ लाख ३० हजार रुपये रकमेची व्ही एच एस ट्रेडर्स एलएलपी आटपाडी या कंपनीचे संचालक/ प्रोप्रायटर यांनी संगणमत करून आर्थिक फसवणूक केली आहे, अशा स्वरूपाची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. सांगली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील याबाबतचा तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या