चरितार्थाने झाले होते अनाथ,आधाराला भेटले मुख्यमंत्री एकनाथ!

घाणंद येथील दिव्यांग तरुणाला मध्यरात्री उद्योगधंद्यासाठी पाच लाखाची केली रोखीने मदत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील दिव्यांग तरुण दीपक रामचंद्र जुगदर कोरोनाबाधित होऊन या महाभयंकर संकटात नोकरी गेल्यामुळे हतबल झाला होता.चरितार्थाने अनाथ झालेला हा तरुण कुटुंबासह मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गेला असता तेथे त्यांची विचारपूस करून या तरुणाला उद्योगधंदा उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने रोख पाच लाख रुपये मदत केली. यामुळे या तरुणाला साक्षात पंढरीचा नाथ भेटल्याची अनुभूती आली.
याबाबत प्रगल्भनायकशी बोलताना दीपक जुगदर म्हणाले,”मी अपंग असून पुणे येथे वैद्यकीय क्षेत्रात काम करत होतो. कोरोणा काळात मी जेजुरी सेंटरला एक वर्ष काम केले.त्यादरम्यान मी कोविड पॉझिटिव्ह आलो. पुण्यात जवळपास दहा दिवस ऍडमिट होतो. स्कोर 18 होता आणि पुण्यातून मला दीनानाथ मंगेशकरला शिफ्ट होण्यास सांगितले गेले. परंतु तेथे बेड न मिळाल्यामुळे मी सांगलीला शिफ्ट झालो. पाच दिवस व्हेंटिलेटर होतो. सिन्नर जी हॉस्पिटलला, जवळपास 21 दिवस ऍडमिट राहिलो, बरा झालो.परंतु माझ्याबरोबर माझी फॅमिली सुद्धा पॉझिटिव्ह आली होती. आयुष्याची जी काही कमाई केली होती, ती सगळी खर्च झाली होती. या आजारात आणि त्याच दरम्यान माझा जॉब गेला. इतकं मोठं आर्थिक संकट आलं होतं की जगायचं कसं हा प्रश्न होता. कसंतरी छोटं मोठं काम करत वर्ष दीड वर्ष गेलं. परंतु आर्थिक परिस्थिती खूप हलक्याची होत चालली होती.
आम्ही 24 सप्टेंबर 2022 च्या रात्री दोन वाजता सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना त्यांच्या राहत्या घरी ठाण्यामध्ये भेटलो.रात्री अडीच वाजता साहेब आले. त्यांनी मला गेटवर उभे राहिलेले बघितलं व गाडी थांबवली. आमची विचारपूस केली, निवेदन वाचलं व पीएंना सांगून आम्हाला आत घरात येऊन गेले. सविस्तर चर्चा केली.
त्यावेळेस त्यांनी मला व माझ्या फॅमिलीला जवळपास पंधरा मिनिटे वेळ दिला.आमच्या अडीअडचणी समजून घेतल्या.त्यानंतर तुम्ही काय बिझनेस उद्योग करू शकता, हे समजून घेतले व आटपाडीमध्ये अनुष्का आयुर्वेदिक औषधे हे सुरू करण्यासाठी त्यांनी आम्हाला पाच लाख रुपयेची बाय हॅन्ड मदत केली. त्यातून आम्ही महालक्ष्मी ऑटोमोबाईल पाठीमागे शिवतेज कम्प्युटर शेजारी अनुष्का आयुर्वेदिक औषधे पंचकर्म सेंटर, कास्यवाटी मसाज सेंटर या शाखा सुरू केल्या. हे केवळ आपल्या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे शक्य झाले. त्यांच्यामुळे आमच्यासारख्या अपंग गरीब लोकांना जगण्याची उमेद मिळाली.
सीएम साहेब म्हणजे खरंच अनाथांचा नाथ एकनाथ! त्यांचे हे ऋण आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्यांनी आमचा रोजी-रोटीचा विषय संपविला. आम्हाला त्यादिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हे तर साक्षात पंढरीचा पांडुरंग भेटला होता.”