विभूतवाडीतील पुलावरुन ऊसाचा ट्रॅक्टर व ट्रॉली कोसळली!

विभूतवाडीच्या पुलावर अपघाताची माला सुरु,
सुजान म्हणताहेत आता कोणाचे कान धरु ?

विभूतवाडीत ऊसाचा ट्रॅक्टर व ट्रॉली पुलावरून खाली कोसळली!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
विभूतवाडी ता.आटपाडी येथील गावाच्या पश्चिमेला गावालगतच पुल आहे. तेथे जाग्यावरच यु टर्न आहे, यू टर्न असल्याने एका वर्षामध्ये सात ते आठ अपघात झाले आहेत.तिघाजणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. वर्षभरामध्ये तेथे अपघाताची मालिका सुरूच आहे.
परंतु याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा कळवूनसुद्धा कोणतीही दखल घेतलेली नाही. विशेष म्हणजे हा रस्ता कराड-पंढरपूर महामार्ग आहे. या रस्त्याने वर्षातून दोन वेळा पंढरपूरला दिंडी वारीने लोक जात असतात. तर महामार्ग असल्यामुळे वाहनांची वर्दळ असते. हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूरच्या ताब्यामध्ये असल्याने आटपाडीतील सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे लक्ष देत नाही. एका वर्षामध्ये सात ते आठ अपघात झालेले आहेत.
गावाच्या पश्चिमेला गावालगतच ओढा आहे. त्या ओढ्यावर पूल आहे.त्या पुलावर अचानक यू टर्न असल्यामुळे अनेक जणांना वाहने ताब्यात ठेवता येत नाहीत. त्यामुळे येथे अपघात होत आहेत.
आज दुपारी दोनच्या आसपास निंबवडे ता.आटपाडी येथून ट्रॅक्टरमध्ये ऊस घेऊन पडळ ता.खटाव येथील साखर कारखान्याकडे ट्रॅक्टर निघाला होता.
परंतु अचानक पुलाजवळ वळण असल्याने ड्रायव्हरला टर्न बसला नाही. त्यामुळे पुलाचा कठडा तोडून ऊस ओढ्यामध्ये पडला आहे. दोन्ही ट्रॉली पुलावरतीच पडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती वेळा येथे अपघात होण्याची वाट पाहणार आहे. एक तर तेथे गतिरोधक करावेत अन्यथा पुलाजवळील वळण रस्ता आहे ते वळण काढावे, तर आणि तरच अपघाताची मालिका थांबेल. अन्यथा अपघाताची मालिका अशीच सुरू राहून जीवितहानी व वित्तहानी होण्याचे प्रमाण वाढतच राहणार आहे. कारण पूर्वेकडून पश्चिमेला वाहन जात असताना पुलावळीवरील वळण वाहनधारकाला दिसत नाही. तर पश्चिमेकडून पूर्वेला येत असताना रस्त्याला उतारा असल्याने वाहने जादा वेगाने येतात आणि अचानक वळण असल्यामुळे तेथे ड्रायव्हरचा गाडीचा ताबा सुटल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तेथे सतत अपघात होत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील यु आकाराचे असणारे वळण हटवावे किंवा पुलाच्या पूर्वेला आणि पुलाच्या पश्चिमेला गतिरोधक करावेत तर आणि तरच येथील अपघात थांबतील.
या पुलावर या वर्षांमध्ये सात ते आठ अपघात झाले आहेत. त्यामध्ये तिघाजणांचा मृत्यू झाला आहे. पुलावर अचानक यू आकाराचे वळण असल्याने ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटत असल्याने येथे सतत अपघाताची मालिका सुरू आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग डोळ्यावरती पट्टी बांधून गप्प बसलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न सुजानांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.