
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज
कळंत्रेवाडी, ता. कराड येथील गावात सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीच्या झाकणाला गंज लागून सडले आहे. तसेच वरून पाण्यात पडत असलेल्या गंजामुळे कळंत्रेवाडीकरांना गंज मिश्रित पाणी प्यावे लागत असून ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचबरोबर राजकीय मंडळी पुढील महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे आखाडे बांधण्यात दंग असल्याचे चित्र आढळून येत आहे.
दरम्यान, गावास पाणीपुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी जुन्या दगडी बांधकामातील टाकीशेजारी नवीन उंच जास्त क्षमतेची सिमेंटची टाकी बांधण्यात आली तसेच प्रत्येक गल्लीत काढलेल्या सार्वजनिक नळांचे रूपांतर घरोघरी नळ जोडण्या देऊन करण्यात आले. साहजिकच गावातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर अलीकडील काळात ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याची तसेच विजेची होणारे नासाडी लक्षात घेता घरोघरी नळांना मीटरही बसवले. परंतु, हे सर्व करत असताना टाकीच्या डागडुजीकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. सध्या टाकीच्या झाकणाला गंज लागल्यामुळे पूर्णपणे सडून गेले असून तो गंज तसाच सरळ पाण्यात पडत असल्यामुळे नागरिकांना गंज मिश्रित पाणी प्यावे लागत आहे. तसेच वातावरणातील दूषित घटक पाण्यामध्ये मिसळण्याची दाट शक्यता असून अज्ञातांकडून खोडसाळपणाने नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याशी खेळण्याचा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे मोडकळीस आलेलं झाकण बदलून नवीन झाकणाला कुलूप बंद करणे गरजेचे आहे. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित सडलेले झाकण बदलून नवीन झाकण बसवावे आणि नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य जपावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती