
मनी फुलला आनंदाचा मळा,अन् अंतरीचा जिव्हाळा!
त्यातूनही प्रसूतला दातृत्वाचा कळवळा !
कमवते हात दातृत्वाचे बनावेत: माजी विद्यार्थी मेळाव्यातील सूर
दिघंची येथे दहावीच्या मार्च १९९३ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
दिघंची
दिघंची येथे दिघंची हायस्कूलच्या मार्च १९९३ च्या एस एस सी बॅचच्या सवंगड्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. कृषी,शिक्षण,ग्रामविकास,अभियांत्रिकी,वैद्यकीय व अन्य क्षेत्रात आपला जीवनरथ घुमविताना स्थैर्यवान बनलेल्या या सवंगड्यांनी आपले कमावते झालेले हात आता दातृत्वाचे बनावेत आणि त्यातून सामाजिक कृतज्ञता व स्वानंदाची फलनिष्पत्ती व्हावी, असा सूर उमटला. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने वाढदिवसाचे औचित्य साधून चंद्रशेखर मोरे या सवंगड्यावर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
बालवयापासून एकत्रितपणे आनंदाने उधळले-बागडलेले सर्व सवंगडी कुमारवयात व किशोरवयातही दिघंची हायस्कूलच्या माध्यमातून एका माळेत विणले गेले. त्यातील हे मणी एसएससीच्या यशानंतर एकमेकापासून वियोग पावले. काम-धामाच्या निमित्ताने त्यांची व्यावहारिक गाठभेट पडत असे. मात्र त्यामध्ये जिव्हाळा निर्माण व्हावा, म्हणून पुणेस्थित असलेले चंद्रशेखर मोरे व आम्रपाली शेटे यांनी या सवंगड्यांना व्हाट्सअपसारख्या सोशल माध्यमाच्या स्त्रोताद्वारे पुन्हा एका माळेत गुंतण्याचा प्रयास सुरू केला. त्यातून त्यांनी बहुतांशीजणांचे व्हाट्सअप नंबर जमवून गट तयार केला. या धाग्यात एकेक मणी ओवीत या सवंगड्यांची श्रृंखला निर्माण केली. याला दिघंची येथे स्थित असलेले बालाजी मोरे व अन्य सहकार्यांनी बळकटी दिली.
कधी काळी मर्यादित स्वरूपात गाठीभेटी व स्नेहभेट होत असतानाच पुढे याला व्यापक रूप येऊ लागले.
कोरोनापूर्वीच्या काही काळामध्ये दिवाळीच्या सणांमध्ये या सर्व सवंगड्याचे एकत्रितपणे स्नेहमेळाव्याच्या रूपाने कार्यक्रम होऊ लागले. त्यातून त्यांची गुंफण अधिक घट्ट होऊन भावनिक नाते स्थैर्यास आले. बालपणीच्या आठवणींनी व जुन्या-पुराण्या खेळांनी, मदतीच्या घटनांनी त्यांना आपलेपणाची जाणीव निर्माण होऊ लागली.
दरम्यान, मध्यंतरी कोरोनाच्या कालावधीत दोन वर्षे हा स्नेहमेळावा खंडित झाला. परंतु व्हाट्सअपच्या माध्यमातून गुजगोष्टी मात्र सुरूच राहिल्या.
मोठे भाग्यवान म्हणून या अस्मानी संकटातून बाहेर पडलेले सवंगडी आता यावर्षी पुन्हा स्नेहमेळाव्याच्या रुपाने एकवटले. एकेकाळी संघर्षातून उभे राहिलेले हे हात मात्र आता दातृत्वासाठी सज्ज झाले आहेत. या सवंगड्यांच्या माध्यमातून सोयीनुसार विशिष्ट निधी जमवून आकस्मितपणे येणाऱ्या संकटांना किंवा गरजवंतांना दान करण्याचा मनोदय हिंगोली येथे ग्रामविकासाचे आदर्शवत कामकाज करणारे ग्रामविकास अधिकारी संतोष मेनकुदळे यांनी मांडला. त्यामध्ये अनेकांनी सूर मिसळला.
त्याचबरोबर ज्या मातृसंस्थेने शिक्षणाचे धडे दिले, त्या दिघंची हायस्कूललाही आवश्यक ती भेट देण्याचे निश्चित झाले. कमवते हात आता दातृत्वाकडे वळू लागले आहेत, याची प्रचिती या उमटलेल्या सुरातून स्पष्ट झाली.
या स्नेहमेळाव्यात अनेकांनी आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भविष्याचा वेध घेणारे वक्तव्यही प्रकट केले. शिक्षण,आरोग्य,अभियांत्रिकी व अन्य व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या या सवंगड्यांनी समाधानाची भावना व्यक्त करीत एकत्रितपणे भेटल्याने आपला आनंदाचा मळा फुलल्याची भावना व्यक्त केली.
या स्नेहमेळाव्यामध्ये चंद्रशेखर मोरे,संतोष मेनकुदळे,अस्पाक जमादार,राहुल भांबुरे,विजय वाघमारे, सुनील जावीर, यशवंत मोरे, हणमंत माने, हणमंत मिसाळ, कैवल्य शेटे, प्रकाश मोरे, बाळासाहेब मोरे, परवेझ कलाल, लक्ष्मणराव खटके, कुमार नळ, धीरजकुमार खटके, प्रतीक गोडबोले, बंडू पाटील, राशीद जमादार, भीमराव शिंदे, दिनकर गिड्डे, अजित कडव, नितीन सासणे,प्रतापसिंह देशमुख, ब्रह्मदेव मोरे,मंगेश गानमोटे,आम्रपाली शेटे,शिलावती काळे, बालाजी मोरे,मुनीर तांबोळी,आदींनी सहभाग घेऊन आपले विचार मांडले. स्नेहभोजनाने स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन