शेततळ्यात पडून नवविवाहितेचा मृत्यू

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत तालुक्यातील मेंढीगिरी येथे शेततळ्यात पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा पाय घसरल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.सौ.सविता सचिन वाघमोडे (वय १९ वर्षे) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सचिन वाघमोडे आपल्या आई व पत्नी समवेत मेंढीगिरी-येळदरी रस्त्यालगत असलेल्या आपल्या शेतात राहत होते.त्यांचा अथणी तालुक्यातील सिनाळ येथील सविता हिच्याशी चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. सविताची सासू देवदर्शनासाठी गेली होती व पती सचिन विद्युत मोटार चालू करण्यासाठी विहिरीकडे गेले होते. सविता पाणी आणण्यासाठी घराशेजारील शेततळ्यात गेली होती. ती आपल्या आई-वडिलांशी फोनवर बोलत असतानाच अचानक पाय घसरून शेततळ्यात पडल्याची घटना घडली. याबाबत आरडाओरडा होऊन आजूबाजूच्या लोकांना हे समजताच सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेतली.
सविताला शेततळ्यातून बाहेर काढून उपचारासाठी जत येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केला असताना तिच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता.
जत ग्रामीण रुग्णालय येथे शिवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यामध्ये झालेली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.