कंटेनरच्या धडकेत अंगणवाडी सेविका ठार

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत येथे कंटेनरच्या धडकेत तालुक्यातील उमराणी येथील अंगणवाडी सेविका कमलाक्षी दाजीबा घोडके ( वय- ३९, रा. शेगाव )ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.धडकेनंतर कंटेनरसह चालक फरार झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मूळची उमराणी येथील रहिवाशी असलेल्या ३९ वर्षीय कमलाक्षी घोडके यांचे माहेर उमराणी आहे तर सासर तालुक्यातीलच शेगाव येथे आहे. उमराणी येथील घारगेवस्ती येथे त्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. दररोज त्या ये- जा करत होत्या.
बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कमलाक्षी घोडके या शेगावहुन उमराणीकडे स्कुटीने निघाल्या असता जत- शेगाव रोडवरील सिद्धार्थ पॉलिटेक्निकजवळ भरघाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने कमलाक्षी घोडके यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेने त्या रस्त्या कडेला झाडीत जावून पडल्या. अपघातानंतर त्या भागातील तरुण जमा झाले व त्यांनी गंभीर जखमी झालेल्या कमलाक्षी घोडके यांना झुडपातून बाहेर काढले.
या अपघाताची माहिती मिळताच प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे, विलास काळे,कोतवाल सुभाष कोळी, आप्पा शिंदे हे घटनास्थळी आले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून घेत जखमी घोडके यांना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सांगली येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.