बुद्धवासी भगवान धर्मा देठे (गुरुजी) द्वितीय पुण्यस्मरण दिन!

निंबवडे ता.आटपाडी येथील सामान्य कुटुंबातील असामान्य व्यक्तिमत्व बुद्धवासी भगवान धर्मा देठे (गुरुजी) यांचा आज द्वितीय पुण्यस्मरण दिन! त्यानिमित्त थोडसं..!
बुद्धवासी धर्मा गोविंद देठे (गुरुजी) यांच्या संस्कारक्षम विचाराचा वारसा लाभलेले भगवान देठे (गुरुजी) लहानपणापासूनच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून होते.१९६० च्या दशकामध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा ते शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले, तेव्हा निंबवडे पंचक्रोशीतील लोकांना दीनदलित,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे फारसे महत्त्व नव्हते. तत्कालीन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत,अशी गुरुजींची मनोधारणा होती. त्यामुळे येथील समाजातील, बहुजन समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले व त्याचाच प्रत्यय म्हणून त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. विधान परिषदेचे विद्यमान सदस्य-आमदार- गोपीचंद पडळकर हे त्यांचेच विद्यार्थी असून ते आज येथील युवा पिढीचे प्रेरणास्त्रोत बनले आहेत.
ज्ञानदान म्हणजे व्यवसाय नसून कर्तव्य आहे, असे समजून १९८० च्या दशकामध्ये त्यांनी प्रौढ शिक्षणासाठी पुढाकार घेतला. येथील असंख्य अंगठे बहादूर लोकांना शिक्षीत केले व तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करून गुरुजींनी आवर्जून सर्वस्पर्शी राहण्याचा प्रयत्न केला.
समाजात वावरत असताना गुरुजींनी येथील गोरगरिबांच्या अडचणीत सापडलेल्या अनेक दुर्बलांच्या निराधारांच्या व्यथा सोडवल्या.
एकूणच काय, शिक्षण,संपत्ती,ताकद असताना देखील गुरुजींनी उभ्या आयुष्यात कोणालाही अपशब्द वापरला नाही किंवा कोणाचा अवमान केला नाही.म्हणूनच आजही लहानांपासून मोठ्यांच्या तोंडून गुरुजींच्याबद्दल एक मनमिळाऊ व अजातशत्रू व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्याची खंत वेळोवेळी बोलून दाखवली जाते.अशाच या उत्तुंग व्यक्तिमत्वास तमाम ग्रामवासियांच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!