सशाची शिकार करणाऱ्या टोळीतील एकजण ताब्यात,सहा फरार

साळमाळगेवाडी येथे सशाची शिकार करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या एका संशयित आरोपी अटक ; सहा जण फरार;जत वन विभागाची कारवाई
अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत तालुक्यातील साळमाळगेवाडी येथील पाटील- पडवळे वस्तीलगतच्या वनहद्दीत सशाची शिकार केल्याप्रकरणी हलाप्पा धुंदाप्पा बेरड (रा. ब्याकुड. अल्कणुर ता. रायबाग. जि. बेळगाव) यास अटक केली आहे.त्याच्यासोबत असणारे सहा आरोपी फरार असून ते कर्नाटकातील आहेत. हलाप्पा बेरड यांच्याकडून मृतवस्थेतील दोन ससे ताब्यात घेतले आहे.तीन मोटरसायकली जप्त केल्या आहेत.ही कारवाई वनविभागाने शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केली आहे. रात्री उशिरापर्यंत फरार आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की,साळमळगेवाडी येथील पाटील व पडवळे वस्त्यालगत वन विभागाचे वन आहे. या परिसरात कर्नाटकातील काहीजण वन्य प्राण्यांची शिकार करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती यानुसार वनविभागाने वन हद्दीत छापा टाकला असता वन विभागाच्या काही अंतरावरच एका शेततळ्याजवळ संशयित सातजण वनप्राण्यांची शिकार करत असताना दिसून आले. यावेळी संशयित आरोपी हलाप्पा बेरड यास वन विभागाने ताब्यात घेतले. यातील सहा जण आरोपीने पलायन केले आहे. मात्र त्यांच्या मोटरसायकली तिथेच टाकून गेले. रात्री उशिरा हलाप्पा बेरड या संशयित आरोपीसह सात जणावर वनविभागाने भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्यव्ये गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई वनक्षेत्रपाल प्रविण दादासो पाटील ,वनरक्षक गणेश दुधाळ, प्रकाश गडदे ,माधव मुसळे, निलेश क्षरबिद्रे यांनी केली आहे.