

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड
शेनवडी, ता. माण येथील श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी देवस्थानची वार्षिक यात्रा शनिवार, दि. ८ ऑक्टोबर ते सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेस घटस्थापनेपासून उत्साहात प्रारंभ झाला. यात्रा कालावधीत घटस्थापना, हरजागर, घटविर्सजन, देवाचा छबिना, देवाचे शिलंगण व सीमोल्लंघन असे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. या कालावधीमध्ये देवाच्या मूर्तीस अलंकार व पारंपरिक वस्त्रांनी सजवले गेले.
शनिवार दि. ८ऑक्टोबर रोजी लहान यात्रा असून श्रीनाथाचा छबिना, भाकणूक, नैवेद्य, ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे. रविवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यादिवशी महाप्रसाद, श्रीनाथाचा छबिना, भाकणूक व यात्रेची सांगता होणार आहे. दुपारी ३ वाजता ढोल, ताशा, झांजांच्या निनादात, गुलालाची उधळण करत भाविक व गावकरी श्रीनाथाच्या जयघोषात पालखीपुढे नाचत मानाच्या रंगाचे शिंपण करत सवाई सर्जाचं चांगभलंचा जयघोष केला जातो. रात्री ९ वाजता कोल्हापूर येथील सप्तसूर ऑर्केस्ट्रा हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे. या कुस्ती मैदानात ५० रुपयांपासून ते ५१ हजार रुपयांपर्यंत कूस्त्या होणार आहेत.
श्रीनाथ म्हस्कोबाच्या यात्रेनिमित्त भाविक विविध जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने सहभागी होतात. शेनवडी पंचक्रोशी परिसरात भक्तिमय वातावरण झाले आहे. हाकेला धावणारा, नवसाला पावणारा अशी ओळख आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात आली आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रा कमिटीच्यावतीने भाविकांसाठी निवास व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती