….अन्यथा वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करु

दलित शेतकऱ्याचा निवेदनाद्वारे वीज वितरण कार्यालयाला इशारा
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड

वीज वितरण कंपनीने 12 ऑक्टोंबर पर्यंत वीज कनेक्शन जोडणी केली नाही, तर म्हसवड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दलित शेतकरी तुकाराम श्रीपती वाघमारे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, वडजल तालुका माण येथील दलित शेतकरी तुकाराम श्रीपती वाघमारे वय 65 वर्ष यांना मागासवर्गीय कोट्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमधून वीज कनेक्शन 2017 ते 2018 रोजी मंजूर झाले होते. परंतु अद्यापपर्यंत वीज वितरण कंपनीने कनेक्शन जोडणी केलेली नाही. याबाबत लेखी अर्ज करून म्हसवड, दहिवडी, वडूज विद्युत वितरण ऑफिसला फोन करून ते फक्त उडवा
उडवीची उत्तरे व आश्वासने देतात. सध्या वीज वितरण कंपनीने पोल, तारा ओढणे, डीपी बसवणे, ही कामे पूर्ण केले आहेत. परंतु अडीच वर्षे झाली तरी लाईट कनेक्शन आणि मीटर बसवणे बाकी आहे.
लाईट कनेक्शन व मीटर बसवण्यासाठी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे हेलपाटे मारले. अनेक वेळा विनंतीही केल्या. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी लाईट कनेक्शन व मीटर बसवण्याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई केली असल्याचे निवेदनात म्हटले असून या वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे माझ्या शेतीचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच मला मानसिक खूप त्रास होत आहे.
संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यांनी आठवड्याच्या आत लाईट जोडणी व मीटर बसवण्याचे काम करावे अन्यथा बुधवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी म्हसवड येथील वीज वितरण कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दलित शेतकरी तुकाराम वाघमारे यांनी दिला असून जर जीवितास बरे वाईट झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी वीज वितरण कंपनीची राहील असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, वीज वितरण कंपनी वडूज, वीज वितरण कंपनी दहिवडी, म्हसवड तसेच म्हसवड पोलीस ठाणे यांना देण्यात आलेले आहेत.