शिंगणापूरात महिलेचा दगडाने ठेचून खून

एक संशयित शहर पोलिसांच्या ताब्यात
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर हद्दीत श्रीमान काशिनाथ दादा लोणारी या कॉम्प्लेक्सच्या पायऱ्यावर एका ४० ते ४५ वर्षीय भिक्षेकरु महिलेचा दगडाने ठेचून खून केलेला मृतदेह शनिवार दि १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता आढळून आल्याने शिगंणापुर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिंगणापूर हद्दीत रेल्वेच्या बोगद्या जवळ असलेल्या राजेंद्र लोणारी यांच्या मालकीचे कोपरगाव -वैजापूर रस्त्याच्या कडेला दोन मजली श्रीमान काशिनाथ दादा लोणारी नावाचे कॉम्प्लेक्स असून यात अनेक छोटे-मोठे गाळे आहे याचं कॉम्प्लेक्स मध्ये भाडेतत्त्वावर उमेश निरगुडे यांचे आरुष मिल्क अँड आईस्क्रीम पार्लरचे दुकान आहे. निरगुडे हे आपल्या नेहमीच्या वेळेनुसार शनिवार दि १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या दुकानाच्या शटर जवळच कोणीतरी प्रथमदर्शनी पांघरूण घेऊन झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी त्याला दुरूनच आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु समोरून काही प्रतिसाद मिळत नव्हता.यावेळी त्यांचे लक्ष अचानक आसपासच्या पायऱ्यावर गेले असता पायऱ्यावर मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा दिसला. त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांना आवाज देत काही माणसे बोलावून त्यांना ती परिस्थिती दाखवली. त्यातील उपस्थितीत नागरिकांमधून कोणीतरी एकाने गावचे सरपंच सुनीता संवत्सरकर यांचे पती भीमराव संवत्सरकर यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली असता संवत्सरकर यांनी तत्काळ कोपरगाव शहर पोलिसांना संपर्क साधून माहिती दिली.
शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी जाधव, पोलीस नाईक जालिंदर तमनर यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपासणीसाठी सदर बेवारस महिलेचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
सदरच्या कॉम्प्लेक्सच्या पायऱ्यावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे सडे आढळून आले. तर चार-पाच लहाण दगड देखील रक्ताने माखलेली आढळून आल्याने भिक्षेकरू महिलेचा खून दगडाने ठेचून झाला हे यातून उघड झाले. महिलेचा मृतदेह आढळला तेथील आरुष मिल्क पार्लरचे मालक उमेश निरगुडे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या दुकानाच्या बाहेर सी.सी.टीव्ही कॅमेरा बसवलेला असून त्या कॅमेरामध्ये कैद झालेल्या दृश्यात अंदाजे ३० ते ३५ वर्षीय पुरुष त्या मृत महिलेचे पाय धरून ओढताना दिसून आला आहे तर त्या मृतदेहाची मान हलवत उठवण्याचा देखील प्रयत्न करत आहे तसेच तो त्या मृतदेहा जवळ पांघरून घेऊन झोपलेला दिसून येत आहेत तर परत काही वेळानं त्याला जाग आल्यानंतर तिथून जाताना त्या मृतदेहावर पांघरून टाकताना तो दिसून आला आहे.सदर घटनेचे गांभिर्य लक्ष्यात घेता शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तत्काळ आपली तपासाची चक्रे फिरवून कोपरगाव रेल्वे स्टेशन परिसरातून सी.सी.टीव्ही मध्ये त्या महिला मृतदेहा जवळ हालचाल करतांना कैद झालेल्या एका परप्रांतीय पुरुषास संशयितास ताबडतोब ताब्यात घेतले असुन सदर खुनाची घटना शिंगणापूर गावच्या पोलीस पाटील सविता प्रशांत आढाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर प्रमाणे २९९/२०२२ भा.द.वी कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे पुढिल तपास करत आहे.