सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते तांबटमाळ-चिंबोड हे स्वप्नातील गाव म्हणून घोषित!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पाली/बेणसे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये ७५ स्वप्नातील गावे बनवण्यात आली आहेत.सुधागड तालुक्यातील तांबडमाळ-चिंबोड हे यामधील एक स्वप्नातील गाव.
स्वदेस फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी स्वप्नातील गाव म्हणून तांबडमाळ – चिंबोड हे गाव घोषित केले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापक झरीना स्क्रुवाला , मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे , संचालक राहुल कटारिया, उपसंचालक तुषार इनामदार, सुधागड तालुक्याचे तहसीलदार दिलीप रायन्नावर गट विकास अधिकारी अशोक महामुनी, पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे, माजी सभापती पी. डी. डूमना, राज आश्रमचे हितेशभाई मेहता व सरपंच पारुताई चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांनी गीत व नृत्य याच्या माध्यमातून गावातील विविध विकास कामांचे सादरीकरण करण्यात आले.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापिका झरीना स्क्रूवाला यांच्यासोबत सर्व पाहुण्यांनी गावांमधील विकास कामांना भेट दिली, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना स्वदेस फाउंडेशन च्या वतीने बांधण्यात आलेली गावांमधील स्वच्छ शौचालये व पाणी प्रकल्प व पाण्याचा निचरा होण्यासाठी तयार करण्यात आलेले शोष खड्डे खूपच आवडले, त्यांनी ग्रामस्थांच्याकडून शोष खड्ड्या विषयी अधिक माहिती जाणून घेतली व गाव स्वच्छ आणि सुंदर नियमितपणे ठेवल्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन केले .
यावेळी सोनाली कुलकर्णी, झरीना स्क्रूवाला व मंगेश वांगे यांच्या वतीने गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
स्वदेस फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली गावात दोन वर्षांपूर्वी संपूर्ण गावाला एकत्रित करून गाव विकास समिती स्थापन करण्यात आली होती. गाव विकास समिती, स्वदेस फाउंडेशन व शासन यांच्या माध्यमातून मागील २ वर्षांपासून गावात हरित क्रांती, वृक्ष लागवड, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, पथदिवे, हागणदारी मुक्त गाव, शासकीय पेन्शन, शासकीय मूळ कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, महिला बचत गट, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, घरकुल योजना, करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, सौर पथदिवे, १००% कुटुंबांना सौरऊर्जा सर्व कुटुंबांचा आरोग्य विमा अशा अनेक उपक्रमातून स्वप्नातील गाव घडवले आहे. स्वदेस फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकास कामांसाठी साठ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च गावासाठी करण्यात आला आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी स्वदेस फाउंडेशचे रायगड व नाशिक जिल्ह्यामध्ये स्वप्नातील गावे घडवत असल्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले व उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी स्वप्नातील गाव मोहिमेमध्ये स्वदेस फाउंडेशन व गाव विकास समितीच्या बरोबरीने सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले.
गाव विकास समितीच्या प्रयत्नांमुळे व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच स्वप्नातील गाव बनलेले आहे व हे गाव बघून खूपच आनंद झाला असे सांगितले.
स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापिका झरीना स्क्रूवाला यांनी गाव विकास समिती च्या पुढाकारने स्वप्नातील गाव घडवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल प्रशंसा केली व स्वदेस फाउंडेशनच्या टीमचे विशेष कौतुक केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी एका वर्षामध्ये गावांमध्ये झालेला बदल हा अतुलनीय आहे व इतर गावांनी तांबडमाळ चिंबोड गावापासून आदर्श घ्यावा व आपले गाव ही स्वप्नातील गाव बनवावे असे नमूद केले.
तहसीलदार दिलीप रायान्नावार यांनी गाव विकास समिती व स्वदेस फाउंडेशनच्या कामाचे कौतुक करून पुढील टप्प्यामध्ये गावातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा व अधिकारी बनावे अशी इच्छा व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी मुला मुलींनी मोबाईल पासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला व स्वप्नातील गावाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमा प्रसंगी गाव विकास समितीतील सदस्यांनी त्यांचा आदर्श गावाचा प्रवास कसा होता या विषयीचा अनुभव सांगितला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश कोकरे यांनी त्यांचे सुपुत्र श्रीधर कोकरे यांना समाजकार्य करण्यासाठीं पाठिंबा दिल्याबदल समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष सुधागड तालुका मराठा समाज योगेश मोरे, ग्रामसेवक सुनील पानसरे, पोलीस पाटील वामन सुतक , स्वदेस फाउंडेशन चे वरिष्ठ व्यवस्थापक शिवदास वायाळ, सहव्यवस्थापक समिर शेख, सुश्मिता मूर्ती, समन्वयक श्रीधर कोकरे , किरण शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी गाव विकास समिती सदस्य यांनी मागील दोन वर्षांचा प्रवास व त्याप्रवासा दरम्यान लाभलेले स्वदेस फाउंडेशन, शासन व इतर संस्थांच्या माध्यमातून त्यांनी गावाचा कसा कायापालट केला त्याबद्दल सविस्तर माहिती मान्यवरांना दिली. तसेच कार्यक्रमाप्रसंगी सर्व मान्यवरांनी ग्रामविकास समिती आणि ग्रामस्थांचे तोंड भरून कौतुक केले .