स्मशानभूमी डीपीचे ग्रहण सुटता सुटेना!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज

कळंत्रेवाडी,ता.कराड येथील स्मशानभूमीलगत असलेल्या महावितरणच्या विद्युत डीपी मधील तांत्रिक बिघाड पाचवीलाच पुजलेला असल्यामुळे स्मशानभूमी डीपीचे ग्रहण काही सुटता सुटेना अशी म्हणायची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.
दरम्यान,या डीपीवरती जवळपास बारा कृषी पंप कनेक्शन्स असून त्याद्वारे ५० ते ६० एकर शेती ओलिताखाली आणली जाते.परंतु,अलीकडील काळात या डीपीवर वारंवार होणाऱ्या विद्युत घोटाळ्यांमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून महावितरणचे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आढळून येत आहे. सतत फ्युज तारा उडणे, लग्ज,जम्प निकामी होणे. यांसारखे छोटे-मोठे विद्युत घोटाळे आणि नित्याचेच बनले आहेत. सध्या पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून सोयाबीन तसेच भाजीपाला वर्गीय पिकांना पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे.परंतु,या डीपीवर होणाऱ्या विद्युत घोटाळ्यांमुळे पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून शेतकरी देशोधडीला लागायची वेळ आली आहे. तरी उंब्रज महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून या डीपीचा कायमस्वरूपी प्रश्न निकालात काढावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.