रग्गड पाऊस,गच्च पाणीसाठा,घोर मिटला!


दमदार पावसाने कवठेमहांकाळ तालुक्यात मुबलक पाणीसाठा,शेतकरी सुखावला, ११ तलावाच्या समाधानकारक स्थितीमुळे वर्षभराची चिंता मिटली!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ

कवठेमहांकाळ तालुक्यात पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे तालुक्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे.त्यामुळे वर्षभराचा पाण्याचा प्रश्न अगदी निकाली निघाला आहे.त्यामुळे शेतकरीराजा सुखावला आहे.
तालुक्यात चालूवर्षी सुरवातीला वरूणराजाने तालुक्याच्या काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला होता.तदनंतर केवळ ढगाळ वातावरण व पावसाची केवळ भुरभुर त्यामुळे पाणीसाठ्यात किंचितही वाढ झाली नाही.तरीही बळीराजाने उपलब्ध ओलीवर कश्याबश्या केलेल्या पेरणीच्या पिकांची पुरती वाट लागली.पिकापेक्षा तणच जास्त वाढल्याने आहेत्या पिकांची वाढच झाली नाही.त्यामुळे घाटमाथ्यावरील बर्याच शेतकर्यांनी आहे त्या पिकात कुळव घालून किंवा रोटर मारून खरिपाचे पिक नाहीसे केले व पुढील रब्बी हंगामासाठी रान तयार केले आहे.त्यामुळे त्यांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागला.
सध्या तालुक्यात बर्याच भागात वरूणराजाची मध्यम स्वरूपाची बरसात अद्याप सुरुच आहे.त्याचा परिणाम द्राक्ष छाटणीवर होत असून त्या लांबल्या जात आहेत तर काही भागात संकटावर मात करून तयार झालेली खरीपाची पिके शेतातच कुजू लागली आहेत.
चालू वर्षी पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात वरूणराजाने चांगलीच फलंदाजी केल्याने तालुक्यातील ओढे,नाले,बंधारे भरून वहात आहेत.तालुक्यातील एकुण ११ तलावांपैकी कुची,रायवाडी,लांडगेवाडी,लंगरपेठ,नांगोळे,बोरगांव,हरोली,दुधेभावी,घोरपडी,बंडगरवाडी या लघु तर बस्साप्पावाडी,मध्यम प्रकल्पापैकी केवळ लांडगेवाडी तलावाचाच पाणीसाठा सीलखाली म्हणजे ६.२१ % इतकाच असुन रायवाडी,दुधेभावी,घोरपडी ,कुची व नांगोळे हे तलाव १०० % भरले आहेत तर उर्वरित लंगरपेठ,बोरगांव,हरोली,बंडगरवाडी व बस्साप्पावाडी या तलावात समाधानकारक म्हणजे ५०% च्या पुढे पाणीसाठा उपलब्ध आहे.१२/०९/२०२२ पर्यंतच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्प तलावातील पाणीसाठा हा पुढीलप्रमाणे :—
(द ल घ फु मध्ये)
१) कुची :- (७९.५)
२) रायवाडी :- (७६.६०)
३) लांडगेवाडी :- (२.३०) सीलखाली.
४) लंगरपेठ :- (६१.००)
५) नांगोळे :- (४५.८५)
६) बोरगांव :- (२९.७०)
७) हरोली :- (१७.९)
८) दुधेभावी :- (१४०.६३)
९) घोरपडी :- (५३.२७)
१०) बंडगरवाडी :- (६०.५३)
११) बस्साप्पावाडी :- (२६४.१७)
इतका पाणीसाठा १२ सप्टेंबरअखेर उपलब्ध आहे.