जत येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
देशाच्या सीमेचे रक्षण करीत असताना हाडे गोठविणा-या थंडीतही शत्रूशी युध्द करणा-या सैनिकांना निवृत्तीनंतरही न्यायहक्कासाठी आपल्या अप्तेष्टांबरोबर संघर्ष करावा लागत आहे. ही शोकांतिका असून माजी सैनिकांसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासनातील अधिकारी यांना सोबत घेऊन त्यांच्या समस्या सोडवू असे प्रतिपादन आमदार श्री. विक्रमसिंह सावंत यांनी केले.
येथील माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन जत यांच्यावतीने मार्केटयार्ड जत येथील माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनच्या कार्यालयात कारगिल विजयोत्सव दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी आमदार श्री. विक्रमसिंह सावंत, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, डाॅ. रविंद्र आरळी, जिल्हा बॅंकेचे संचालक सरदार पाटील, माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग आदीनी कारगिल युध्दात देशरक्षणासाठी शहिद झालेल्या ५२७ जवानांना पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी बोलताना आ.विक्रमसिंह सावंत म्हणाले, पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगिलच्या युध्दात रक्त गोठविणा-या थंडीत आपल्या देशाच्या रक्षणासाठी जवानानी उंचावरील टेकडीवर दबा धरून बसलेल्या शत्रूला यमसदनी पाठवून जो पराक्रम केला आहे. व शत्रूने बळकावलेला भाग परत आपल्या ताब्यात घेतला आहे. त्या पराक्रमाची इतिहासात नोंद झाली आहे. तोच कारगिल विजयोत्सव दिवस साजरा करताना जे वीर जवान शहिद झाले त्या जवानांना देशबांधवांनी अभिवादन करावे असे ही आ.सावंत म्हणाले.
यावेळी बोलताना केंद्रीय सिमेंट काॅर्पोरेशनच्या राष्ट्रीय समितीचे संचालक डाॅ. रविंद्र आरळी म्हणाले, रक्त गोठविणा-या थंडित देशसेवा करणा-या भारतीय जवानाचा आम्हाला अभिमान असून जवानांप्रती तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यानी जे निर्णय घेतले होते. त्यामुळे जवानांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही जवानांच्या बाबतीत चांगली भूमिका घेत असून सिमेंट काॅर्पोरेशनच्या माध्यमातून आम्ही मदत करित आहोत.
यावेळी बोलताना जि.प सदस्य सरदार पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या मिलेट्रीमधील काही किस्से सांगितले व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस प्रशासन व महसुल प्रशासन यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळत नसून अपमानीत व्हावे लागते अशी भावना व्यक्त केली व आ.सावंत यानी याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी केली.
पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे म्हणाले, आम्ही माजी सैनिकांचा सन्मान करतो. जर कोणाला काही समस्या व तक्रारी असतील तर त्यानी थेट माझ्याशी संपर्क साधावा त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले.
यावेळी ऑन. कॅप्टन नामदेव कटरे यांनी आपण प्रत्यक्ष कारगिल युद्धात सहभागी असल्याने आपल्याला जो अनुभव आला तो सांगितला. पाकिस्तान गद्दार असून हा देश विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष ऑन.कॅप्टन बबन कोळी, दत्ता शिंदे, उमाजी म्हारनूर, आकाराम बिसले, सतीश शिंदे, विजय कुरणे आदींसह माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन चे सर्व अधिकारी व माजी सैनिक उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत मोहन माने-पाटील यांनी केले तर आभार महेश जगताप यांनी मानले.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन