साहेब न्हाय आळ्यावर,कारभार आला चव्हाट्यावर!

माळशिरस मंडल कृषी अधिकारी कार्यालय ‘डी-ॲक्टिव्ह मोड’मध्ये !
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकरी माळशिरस कृषि कार्यालयात शेतीच्या माहितीसाठी येत असतात. मात्र १ जूनपासून मंडल कृषी अधिकारी कार्यालयाकडे फिरकले नाहीत. माळशिरस मंडलमध्ये २६ गावे आहेत.ऑफिस बंद असल्याने शेतकऱ्यांनी विविध योजनांचे फॉर्म भरलेले आहेत.तसेच निवड यादीत आलेले शेतकरी मंडल ऑफिसला माहिती घेण्यासाठी हेलपाटे मारत आहेत. मात्र ऑफीस वेळोवेळी बंद असलेले दिसून आले.फोन केला तर फोन उचलला जात नाही, मग आम्ही करायचे तर काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता खरीप हंगाम तोंडावर असताना मंडल कृषी अधिकारी ऑफिसला दिसून येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे .मंडल कृषी ऑफिसला शेतकऱ्यांनी ठिबक, ट्रॅक्टर ,अवजारे ,कांदा चाळ ,अस्तरीकरण , रोटावेटर , मंळणी यंत्र इत्यादी कामे पूर्ण केली असून त्यांना अनुदान देण्यासाठीचे मोका तपासणी स्तरावर शेतकऱ्याला मंडल कृषी अधिकारी वेटीस धरत आहे. दोन-दोन महिने पाठवला जात नाही, अशी शेतकऱ्यांतून चर्चा होत आहे . फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला नाही. त्यामुळे अशा कृषी अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्रास दिला जात आहे. याच्यावर तालुका अधिकाऱ्यांचे नियंत्रण दिसून येत नाही. या प्रकाराबाबत वरिष्ठांनी दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .

“जळभावी येथील शेतकरी किसन रामा राऊत यांना मळणी यंत्र मंजुर झाले होते. त्यांनी २ लाख, ५० हजार रुपये भरून ४ महिने झाले तरी साहेब लक्ष देत नाहीत. मंडल कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांची लवकरात लवकर बिले काढावीत.”
किसन राऊत, सरपंच, ग्रामपंचायत जळभावी.

“खुडूस येथील शेतकरी मिताबाई मधुकर काळे यांनी रोटावेटर खरेदी करून २ महिने झाले. अद्याप रोटावेटरचे पैसे आले नाहीत.या साहेबांना भेटण्यासाठी १ जुन ते १५ जुनपर्यंत मी व माझे मालक यांनी अनेक हेलपाटे मारले. पण एकदाही मंडल कृषी अधिकारी दिसुन आले नाहीत . ‘आज या, उद्या या, बघु’ असे म्हणत नंतर तर फोन रिसीव्ह करायचेच बंद केलं. १५ दिवस मंडल कृषी अधिकारी ऑफीस बंद ठेवत असतील तर शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटणार ?”
मिताबाई मधुकर काळे,खुडूस