
धनगाव येथे ‘अर्थक्रांती..’ ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा उत्साहात
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
धनगाव
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कौटुंबिक आणि सामाजिक क्षेत्रात आम्ही पूर्णपणे समाधानी असून आता आम्हाला फक्त सन्मानाची संध्याकाळ हवी आहे, असे गांभीर्यपूर्ण वक्तव्य अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अंगीकृत ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियानचे जिल्हा सचिव गजानन पाटील यांनी केले. धनगाव ता.पलूस येथे हनुमान मंदिर येथे संपन्न झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थितांना संबोधित होते.अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील होते.
पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्तीच म्हणून शासनाने घोषित करावे, कारण वयाच्या साठ वर्षापर्यंत अनेक बुद्धिवंत,प्रज्ञावंत, डॉक्टर, वकील, इंजिनीयर, अर्थतज्ञ, शिक्षक, प्राध्यापक, वीर जवान, शेतकरी, शेतमजूर, कारागीर, व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, कलाकार आणि अन्य सर्व क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक मग ते कोणत्याही जाती धर्माचे आणि प्रांत भाषेचे असोत, प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्रात देश उभारणीसाठी अहोरात्र कष्ट केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे. याशिवाय काही अपवाद वगळता प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आजची तरुण आणि कर्तबगार पिढी देशाला बहाल केली आहे. आता वयाच्या मानाने शरीर क्षीण झाल्याने आणि कार्यक्षमता कमी झाल्याने आम्हाला काम होत नाही. आता आम्हाला काहीही मिळवायचे नाही. आमच्या गरजाही कमी झाल्या आहेत. आमच्या अपेक्षाही काही नाहीत. या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी दवाखाने आणि औषधोपचाराची मोफत सोय शासनाने करावी. आमच्या उदरनिर्वाहाची सर्वस्वी जबाबदारी आता शासनाने घ्यावी आणि आम्हाला अभिप्रेत असणारी सन्मानाची संध्याकाळ मिळवून द्यावी, एवढी माफक अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांनी शासनाकडून करणे काहीही गैर नाही, असे वाटते. आता आम्ही वृद्ध नसून जेष्ठ आणि अनुभवसमृद्ध आहोत हेही शासनाने लक्षात घ्यावे.
केंद्र सरकारकडे पाठविलेल्या प्रस्तावाची माहिती जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी दिली. ते म्हणाले सन २०१९ च्या राष्ट्रीय आर्थिक सर्वेनुसार देशातील नागरिकांचे दरडोई वार्षिक उत्पन्न एक लाख २६ हजार रुपये आहे. त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकास शासकीय कोशातून दरमहा दहा हजार रुपये सन्मानधन द्यावे आणि तेही महागाई भत्यास जोडलेले. याचे कारण आपल्या देशाचे वार्षिक उत्पन्न २०० लाख कोटी रुपये आहे.त्यापैकी आम्ही फक्त सहा ते सात टक्के सन्मानधनाच्या रूपाने मागत आहोत.
याशिवाय ज्येष्ठांच्या सन्मानासाठी सन्मान मंत्रालयाची स्थापना करावी. तेथे कॅबिनेट दर्जाचा मंत्री आणि स्वतंत्र बजेटची व्यवस्था केंद्र सरकारने करावी. ज्येष्ठांची अवहेलना आणि मानहानी टाळण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याचे धर्तीवर विशेष आचारसंहिता निर्माण करावी आणि फूटपाथ, बगीचे, वाचनालय, क्रिडांगण, संरक्षण, हास्य क्लब, दवाखाने आणि विरंगुळा केंद्र यासारख्या नागरी सुविधा विशेष श्रेणीच्या स्वरूपात उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रस्तावित असून तो मान्य करून घ्यायचाच ,यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यातून ज्येष्ठ नागरिकांची स्वतंत्र मतदारयादी आपण तयार करूया. त्यासाठी आपला आधारकार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि सहभाग मूल्य रुपये दहा भरून नाव नोंदणी करावी. हे अभियान देशभर सुरू असल्याचे अध्यक्ष मोरे पाटील यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलेल्या सवलतींची माहिती वाळवा तालुक्याचे कार्याध्यक्ष हनुमंत पाटील यांनी सांगितली. उपाध्यक्ष नारायण सावंत यांनी संघटनेच्या कार्याची आणि वाटचालीची माहिती दिली. संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. किरण पाटील यांनी अनेक उदाहरणे देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा सांगितल्या आणि प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांसाठी गरज भासल्यास मोफत सल्ला देण्याचे मान्य केले. ज्येष्ठ नागरिकांना अध्यात्मिक क्षेत्राची गरज का आहे हे अनेक उदाहरणे देऊन पटवून सांगितले.
गावातील जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देऊ तसेच बगीच्या, वाचनालय उपलब्ध करून देण्याचा मानस सरपंच सतपाल साळुंखे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. वंचित जेष्ठ नागरिकांसाठी स्वतःचा वेळ, पैसा खर्च करून हे वृत्त स्वीकारलेल्या अर्थक्रांती जीवन गौरव अभियानच्या जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत अशी कृतज्ञतेची भावना सरपंच सतपाल साळुंखे यांनी व्यक्त केली.
सकाळी दहा वाजले पासूनच कार्यक्रमाचे ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली होती. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पलुस तालुका अध्यक्ष आणि जिल्हा संघटक सुभाष शिंदे, चंद्रकांत कुलकर्णी, बबन मुळीक यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी वाळवा तालुका अध्यक्ष भोपाल साळुंखे हे सपत्नीक हजर होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विष्णुपंत कुरलेकर भाऊ, सरपंच सतपाल साळुंखे, सिंधुताई यादव, विजया साळुंखे, जिजाबाई साळुंखे, कमल साळुंखे आणि गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक तावदर यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन आणि आभार महादेव यादव यांनी केले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती