
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील हिवतड,राजेवाडी, लिंगीवरे येथील अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना कोळी महादेव या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी व दप्तर दिरंगाईबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करणेबाबतच्या मागणीसाठी विद्यार्थी व पालक उपोषणास बसले आहेत.
दिलेल्या निवेदनानुसार,आटपाडी तालुक्यातील हिवतड, राजेवाडी व लिंगीवरे येथील पालक व विद्यार्थी यांनी २३ मार्च,२०२२ रोजी कोळी महादेव या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑफलाईन अर्ज सादर केले होते. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी, विटा यांनी त्यातील सर्व पुरावे व दस्तऐवज पाहून आटपाडीचे तहसीलदार यांना ऑफलाइन पद्धतीने सर्व पुरावे व कागदपत्रे तसेच स्थानिक चौकशी अहवाल पाठवण्यास सांगितलेले होते. त्याप्रमाणे तहसीलदार यांनी ऑफलाइन पद्धतीने १५ जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर करून घेऊन मंडलाधिकारी खरसुंडी व दिघंची यांना दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी मंडळ अधिकारी यांना अर्जदार यांचा पारंपारिक व्यवसाय व जात, रहिवास संबंधित चौकशीचे आदेश दिले. मंडल अधिकारी व महसूल कर्मचारी हे जाणीवपूर्वक विलंब करत आहेत, त्यामुळे आमच्या संविधानिक, घटनेने दिलेल्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
याप्रकरणी संबंधित मंडल अधिकारी व महसूल अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणीसाठी आज सकाळपासून तहसिल कार्यालय, आटपाडी येथे त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्राचे १५ प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालय विटा यांच्याकडे पाठवावेत अशी मागणी आटपाडीचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
या निवेदनावर नंदकुमार बापू कोळी, नितीन प्रकाश पुंड, विजय बापू कोळी, नारायण प्रल्हाद कोळी, हर्षल नितीन पुंड, रघुनाथ बापू कोळी, सागर विजय पुंड यांच्या सह्या आहेत. यांच्यासह मानसिंग सोपान कोळी, चंद्रकांत शामराव कोळी, डॉ.बापूराव किसन पुंड, ईश्वरा महादेव कोळी, किसन बाळकृष्ण कोळी, संतोष बाळकृष्ण कोळी यांनी उपोषणात भाग घेतला आहे.
या उपोषणास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भारततात्या पाटील, तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे अरुण वाघमारे रवींद्र लांडगे संभाजी देशमुख आदींनी मान्यवरांनी उपोषणास भेट दिली आहे.
या उपोषणाच्या अनुषंगाने आटपाडीचे तहसीलदार यांनी मागणी केलेले महादेव कोळी जातीचे दाखले मिळणेबाबतच्या प्रकरणाच्या अनुषंगाने गृह चौकशी करून मंडळ अधिकारी दिघंची व खरसुंडी यांच्याकडून आज दिनांक ३० मे रोजी तहसील कार्यालयात प्रकरण सादर केली आहेत. या जातीचे दाखला मागणीबाबतची प्रकरणे अंतिम मान्यतेसाठी उपविभागीय अधिकारी, विटा यांना पुढील दोन दिवसांत सादर करणे दक्षता घेत आहे. त्या अनुषंगाने सुरू केलेले उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आटपाडी तहसिलदार कार्यालयद्वारे उपोषणकर्त्यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती