पोटात खंजीर खुपसून महाविद्यालयीन तरुणीची हत्या

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
औरंगाबाद

देवगिरी महाविद्यालयातून बाहेर पडत असताना एका १९ वर्षाच्या महाविद्यालयीन युवतीला ओढत नेऊन पोटात खंजीर खुपसून ठार मारल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असल्याच संशय व्यक्त केला जात असून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. महाविद्यालयाच्या मागील गेटपासून सुमारे २०० फूट ओढत नेऊन तिची हत्या केली आहे. तिच्या परिचयातील युवकाने हा प्रकार केला असून तो फरार झाला आहे.
देवगिरी महाविद्यालयात बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बीबीए) च्या प्रथम वर्गात ही युवती शिकत होती.ती शनिवारी दुपारी महाविद्यालयातून बाहेर पडत असताना संबंधित २२ वर्षीय युवक महाविद्यालयाच्या गेटजवळ आला. त्यावेळी त्या दोघांमध्ये काही वाद झाला. त्याने या युवतीला धरून सुमारे २०० फूट अंतरापर्यंत नेले व त्याच्या जवळील असलेला खंजीर पोटात खुपसून हत्या केली.घटनास्थळावरून तो लगेच फरार झाला. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर हादरला.
ज्या युवकाने ही हत्या केली तो आणि ती युती एकाच परिसरात राहणारे एकमेकांच्या ओळखीचे होते. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना असून वेदांतनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यामध्ये त्या युवकाने तिला ओढत घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तिच्या पाठीवर सॅक असल्याचे व त्या युवकाने तिच्या दोन्ही हातांना धरल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. फरार झालेल्या संशयित खुनी युवकाच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.