देशाला महासत्ता करण्यासाठी गावे सुधारायला हवीत:भास्कर पेरे-पाटील

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

देश महासत्ता करण्यासाठी सर्वप्रथम ग्रामीण भागात सुधारणा आवश्यक आहे. शंभर वर्षांचे आरोग्य मिळण्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि चांगले अन्न मिळाले पाहिजे, असे मत भास्करराव पेरे-पाटील यांनी निमगाव ता.माळशिरस येथे व्यक्त केले.अटल प्रतिष्ठान,माळशिरस यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत गावाच्या विकासासाठी सुसंवाद या विषयावर पहिले पुष्प गुंफताना भास्करराव पेरे-पाटील बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.राम सातपुते होते.प्रास्ताविक के.के.पाटील यांनी केले.यावेळी विचारपीठावर आ.राम सातपुते,सोपानकाका नारनवर,वसंत पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना पेरे-पाटील म्हणाले,आपल्या गावाचा विकास आपणच करु शकतो. त्यासाठी शासनावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. सरपंचांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे व पारदर्शक पद्धतीने गावाचा कारभार केल्यास गावातील लोक सरपंचावर विश्वास ठेवतात.या पद्धतीने मी माझ्या पाटोदा गावात कामे केली आहेत.सरपंचाने गावासाठी करावयाची पंचसूत्री त्यांनी सांगितली. पिण्याचे पाणी शुद्ध असले पाहिजे, पावसाच्या व सांडपाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, गाव व परिसरात फळझाडांचे वृक्षारोपण केले पाहिजे, मुलांचे चांगले शिक्षण झाले पाहिजे, गावातील निराधारांना आधार दिला पाहिजे.सरपंचाने गावकऱ्यांना सुविधा पुरवणे हे सरपंचाचे आद्यकर्तव्य आहे.पेरे पाटील बोलताना पुढे म्हणाले की, प्रत्येक गावात विकासाच्या आड येणाऱ्या प्रवृत्ती असतात अशा प्रवृत्ती दुर्लक्षित करूनच विकास साधला पाहिजे. सरपंच आई आहे, तर ग्रामसेवक कल्पतरू आहे.त्यांना त्रास न देता ग्राम विकासाचे लक्ष्य साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पेरे पाटील यांनी आपल्या विनोदी भाषण शैलीतून परखड मत व्यक्त केले.यावेळी निमगाव व परिसरातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.सुत्रसंचालन संतोष साठे यांनी तर आभार सतीश मगर यांनी मानले.