शेटफळे येथील बंधाऱ्याच्या प्रलंबित कामासंदर्भात पाटबंधारे मंत्री जयंतराव पाटील यांचे चौकशीचे आदेश ; राष्ट्रवादीचे नेते रावसाहेबकाका पाटील,युवक तालुकाध्यक्ष सुरज पाटील यांचा पुढाकार

आटपाडी /प्रतिनिधी:

शेटफळे येथील ओढ्यावर कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून सन 2007 साली मंजूर झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम अर्ध्यावरच का थांबले? याची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे पाटबंधारे मंत्री जयंतराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेबकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरज पाटील व शेटफळे येथील युवक काँग्रेसचे नेते किशोर गायकवाड यांनी ग्रामस्थांसमवेत मंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेऊन काम चालू करण्याबाबत आदेश होण्याची मागणी केली आहे.

शेटफळे येथील ओढ्यावर 2007  साली कोल्हापूर पद्धतीचे दोन बंधारे मंजूर झाले. त्याचे टेंडर काढून त्या कामासाठी ठेकेदारही नियुक्त करण्यात आला. या ठेकेदाराने 2009 सालापर्यंत या बंधाऱ्यावर सुमारे 80 लाख रुपये पर्यंतचे काम केले. त्यानंतर पुढील काम का व कशासाठी थांबले? याबाबत ग्रामस्थ व शेतकरी अनभिज्ञ आहेत. यासंदर्भात लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांना या समस्येवर तोडगा काढण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली होती.परंतु गेले अकरा वर्षे यासंदर्भात शेतकऱ्यांना कोणतेही अधिकृत उत्तर  मिळाले नाही.
शेटफळे गावचे युवक नेते किशोर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष सुरज पाटील यांनी बंद पडलेल्या कामाची पाहणी करून गावातील शेतकऱ्यांसमवेत पालकमंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेतली व काम चालू करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावसाहेबकाका पाटील, अरुण गायकवाड, सौरभ गायकवाड, विशाल गायकवाड,महेश गायकवाड, करगणी येथील रमेश पवार उपस्थित होते.