तलावात बुडून पाच ऊसतोड महिला कामगारांचा मृत्यू

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
लातूर

अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा येथे शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तलावात बुडून पाच ऊसतोड महिला कामगारांचा मृत्यू झाला. या मृत महिला शेजारील पालम तालुक्यातील रामपूरतांडा व मोजमाबाद या गावच्या रहिवासी आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा व त्यांच्या आईचा समावेश आहे.
राधाबाई धोंडीबा आडे (वय ४५), दीक्षा धोंडीबा आडे (वय १९), काजल धोंडीबा आडे (वय १७, रा. रामपूर तांडा, ता.पालम), अरुणा गंगाधर राठोड (वय २५), सुषमा संजय राठोड (वय २१, रा. मोजमाबादतांडा ता.पालम) अशी मृत झालेल्या महिलांची नावे आहेत.
उजना (ता. अहमदपूर) शिवारातील एका शेतात हे सर्व ऊसतोड कामगार ऊसतोडणी करत होते. त्याच शिवारात त्यांचा मुक्काम होता. जवळच आसलेल्या तुळशीरामतांडा शिवारातील पाझर तलावात धुणे धुण्यासाठी या महिला गेल्या होत्या. त्यातील एकजण पाण्यात बुडत असताना तिला वाचविण्यासाठी इतर चार महिला पाण्यात उतरल्या.तेव्हा एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात त्या सर्वजणी पाण्यात बुडाल्या. त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. किनगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.