महिलेवर बलात्कार; निंबवडेतील संशयितास अटक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

महिलेवर बलात्कारप्रकरणी आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील संशयित आरोपी बाबा धुळा पिंजारी यास आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निंबवडे (ता.आटपाडी जि. सांगली) येथील बाबा धुळा पिंजारी (वय ५१ वर्ष) याने दिनांक १८ एप्रिल व २४ एप्रिल,२०२२ रोजी दोन वेळा पीडित महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार आटपाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पीडित महिला आरोपीच्या घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर कपडे धुण्यासाठी गेली असता आरोपीने त्या महिलेस घरात बोलावून घराचा दरवाजा बंद करून महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार करून मारहाण करून घडलेल्या प्रकाराबद्दल बाहेर कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे.
पोलिसांनी तक्रारीनंतर आरोपीला दुपारी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात ३७६,३७६ (२)( एन) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने करीत आहेत.