अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
‘दरिदेवाच्या नावान चांगभलं, आई जक्कमादेवीच्या नावान चांगभल’ च्या गजरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. द-याप्पा देवाच्या यात्रेची सांगता झाली.
मुचंडी येथील श्री.दरिदेवाची यात्रा ही एक आगळीवेगळी यात्रा म्हणून महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्र, केरळ व गोवा या राज्यात ओळखली जाते.
या यात्रेसाठी वरील राज्यातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. ही यात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याच्या सीमेवरील मोठ्या ओढापात्रात भरते.
गत दोन वर्षे कोरोनामुळे ही यात्रा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत भरविण्यात येत होते. परंतु यावेळी कोरोणाचे निर्बंध उठल्याने ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरली होती. महाराष्ट्र व कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रेकरिता जादा बसची व्यवस्था केली होती.
कनमडी ग्रामपंचायत व दरेश्रवर देवस्थान ट्रष्टच्या माध्यमातून यात्रेकरिता आलेल्या यात्रेकरूंची पाण्याची व सर्व ती सुविधा पुरवण्यात आली होती.
यात्रेत विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी आले होते. या यात्रेत मोठ्या प्रमाणात नारळ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. मेवा-मिठाईसह, सौंदर्य प्रसाधने, खेळणी, शोभेच्या वस्तू, कृषीची साधने, कोल्ड्रींक्स,हाॅटेल, हळदी, कुंकू असे विविध प्रकारचे स्टाॅल्स यात्रेत आले होते.
ही यात्रा कर्नाटक राज्यातील कनमडी ग्रामपंचायत यांच्यामार्फत भरविण्यात आली होती.यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक राज्यातील तिकोटा पोलीस ठाण्याचे पोलीस यात्रेत बंदोबस्तासाठी होते. यात्रेकरिता भाविक भक्त दुचाकी, चारचाकी व बैलगाड्यामधून आले होते.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथेप्रमाणे या यात्रेत ज्यांनी ज्यांनी दरिदेवाला नवस केला होता व त्यांचा नवस पूर्ण झाला होता, अशा भाविक भक्तांनी श्री. दरिदेवाच्या प्रत्येक पायरीला नारळ फोडून आपला नवस फेडला. यामुळे या यात्रेत मोठ्या प्रमाणात नारळाची उलाढाल झाली आहे.
या यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत घुळी सोडण्याची प्रथा पुर्वांपार चालत आली आहे. ज्यांच्या घरात श्री.दरिदेव कुळस्वामी आहेत, त्या घरातील एक व्यक्ती घुळी म्हणून या यात्रेत अर्धनग्न अवस्थेत हातात अंबाड्याच्या वाकापासून बनविलेला चाबूक घेऊन तो आपल्या अंगावर मारून घेत ‘दरिदेवाच्या नावान चांगभल, आई जक्कमादेवीच्या नावान चांगभलं’चा गजर करत होता.
बुधवारी श्री.दरिदेवाच्या नैवेद्य अर्पण करण्याचा दिवस असल्याने तासगाव तालुक्यातील विसापूर येथील माने घराण्याकडे श्री दरिदेवाच्या नैवेद्याचा मान असल्याने त्यांनी पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखविला. त्यानंतर हजारो भक्तानी श्री. दरिदेवाला व आई श्री.जक्कमादेवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. गुरुवारी पहाटे श्री. दरिदेवाची पालखी व छबिना फिरवण्यात आला. श्री. दरिदेवाच्या पालखीवर हजारो भाविक भक्तांनी खारीक खोबरे व भंडारेची उधळण केल्यानंतर यात्रेची सांगता झाली.
ही यात्रा चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी देवस्थान व्यवस्थापक कमिटी अध्यक्ष श्री. अलगोंडा बिरादार, उपाध्यक्ष श्री. बसगोंडा पाटील, कार्याध्यक्ष श्री. मल्लापा तुंगळ, शिवानंद मुन्नोळी, भिमराय कोंडी, महांतेश कोरे, हणमंत पुजारी, बाबूगौडा बिरादार, विठ्ठल करवडे, आण्णाप्पा पुजारी, सदाशिव कोळी, पिरणगौडा बिरादार, शिवानंद बिरादार, बसवराज पुजारी, गुरू पुजारी, शिवानंद पुजारी यानी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती