ज्येष्ठ नागरिकास दरमहा १० हजार रुपये सन्मानधन मिळावे


शिराळा येथे अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच’च्या ज्येष्ठ नागरिक जीवन अभियान संघटनेचा मेळावा संपन्न
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
शिराळा

अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अंगीकृत ज्येष्ठ नागरिक जीवन अभियान संघटनेचा मेळावा ग्रामदैवत अंबामामंदिर शिराळा येथे मार्गदर्शक भीमराव गायकवाड (भाऊ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील आणि जिल्हा सचिव गजानन पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. किरण पाटील, कार्याध्यक्ष चंद्रशेखर मोरे, वाळवा तालुका सचिव आर्यन मोहिते, वाळवा तालुका कार्याध्यक्ष हनुमंतराव पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गजानन पाटील यांनी गायलेल्या साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या सर्वधर्मीय प्रार्थनेने झाली. प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांचे स्वागत व सत्कार समारंभ संपन्न झाला. चंद्रशेखर मोरे, आर.एन. मोहिते, हनुमंतराव पाटील, किरण पाटील यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला आणि अनेक उदाहरणे देऊन ज्येष्ठांचे मनोरंजन आणि प्रबोधन केले.
ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून शासनाने घोषित करावी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखमय होण्यास मदत होईल, त्याच प्रमाणे दरमहा दहा हजार रुपये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकास सन्मानधन म्हणून द्यावे, फूटपाथ, बगीचे, वाचनालय, क्रीडांगणे, विरंगुळा केंद्र, नाना नानी पार्क यासारख्या विशिष्ट दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, ॲट्रॉसिटी कायद्याच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आचारसंहिता तयार करून द्यावी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करून तेथे कॅबिनेट दर्जाचा मंत्री आणि त्या खात्यास स्वतंत्र बजेटची व्यवस्था केंद्र सरकारने करावी, अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केलेला असून तो कोणत्याही परिस्थितीत मान्य करून घ्यायचाच अशी प्रतिज्ञा आज आपण करूया आणि ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्याची व्होट बँक तयार करूया.असा प्रस्ताव मान्यतेसाठी ती वोट बँक अत्यंत गरजेची आहे, अशा प्रकारची माहिती जिल्हा सचिव गजानन पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये केली.
आजच्या ज्येष्ठ नागरिकांनी वयाच्या साठ वर्षापर्यंत अहोरात्र कष्ट केले, जीव मारून प्रपंचा केला, मुलाबाळांना सुख लागावे यासाठी अपार कष्ट केले. परंतु हीच मुले आज आई-वडिलांकडे लक्ष देत नाहीत. त्यांच्या औषध पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे आई-वडिलांच्या दवाखान्याचा प्रश्न आणि दुसरीकडे मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न यामध्ये आजचा तरुण अडकला असून तो व्यथित जीवन जगत आहे, अनेक वेळा तो वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येकडे वळत आहे.
अशा बिकट परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून त्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. याशिवाय आजच्या जेष्ठ नागरिक आणि आजपर्यंत देशाचे सर्व कर भरलेले आहेत, सर्व प्रकारचे कायदे पाळलेले आहेत आणि आज मात्र तो व्यथित जीवन जगत आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांना दरमहा किमान दहा हजार रुपये सन्मानधन दिलेच पाहिजे, देशातील अन्य राज्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळते, मग आपल्या महाराष्ट्रातच का नाही अशाप्रकारचा प्रश्न उपस्थित करून जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी ज्येष्ठांच्या व्यथित जीवनाचा आढावा घेतला. केंद्र सरकारकडे दिलेला हा प्रस्ताव मान्य झाला तर होणाऱ्या फायद्याचा आढावा घेतला.
त्यामध्ये तरुण व जेष्ठ सर्वांचे जीवन जगणं आश्वस्त होईल, कुटुंब व्यवस्था बळकट होईल, गावाकडून शहराकडे नोकरीसाठी होणारे स्थलांतरास आळा बसेल, बाजारामध्ये क्रयशक्ती मोठ्या प्रमाणात आल्यामुळे तरुणासाठी रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील, ग्रामीण व्यवस्थेला चालना मिळेल, मध्यम, लघु व लघुत्तम उद्योगक्षेत्रास चालना मिळेल, सामाजिक सौहार्द प्रस्थापित होईल आणि पर्यायाने आनंदी समाजाकडे वाटचाल होईल आणि भेदभावरहित फक्त माणूस म्हणून जगण्याची नव्या मानवता धर्माची सुरुवात होईल असे विचार मोरे पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केले.
हकार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव गायकवाड (भाऊ) यांनी ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र का आलं पाहिजे याचा आढावा घेतला आणि आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंगाचे दाखले देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सिनर्जी हॉस्पिटल मिरज आणि अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अंगीकृत जेष्ठ नागरिक जीवनगौरव अभियान, सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनेच्या सभासदांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले.
महिला अध्यक्षा सौ. वैभवी कुलकर्णी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून प्रबोधन केले. कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती खूप होती. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता शहरातील सर्व जेष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन कामाचा आढावा आणि चर्चा करण्याचा निर्णय अध्यक्ष गायकवाड (भाऊ) यांनी घेतला.
शेवटी आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.