महात्मा फुलेंच्या पुतळ्यासाठी छातीचा कोट करण्याचा निर्धार

आटपाडीत बहुजन समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी शहरात महात्मा फुले चौक येथे स्थापन करण्यात आलेल्या क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले अर्धाकृती पुतळा संवर्धन करणे संदर्भांत आटपाडी शहरातील समस्त फुले, शाहू, आंबेडकर विचारवादी बहूजन समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बुधवार दि. १३ एप्रिल रोजी संत सावंता माळी महाराज मंदीरात (मठात) पार पडली.
या बैठकीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सादिकभाई खाटीक,रि.पा.ई चे तालुका अध्यक्ष रणजित ऐवळे, प्रदेश युवा कार्यकारिणी सदस्य अमोल लांडगे, युवा संघटक प्रशांत पाटील आदि नेते उपस्थित होते.जिल्हा परिषद सदस्य अरूणभाऊ बालटे, माजी उपसभापती भागवत माळी, शिक्षक सहकारी बँकेचे चेयरमन यू.टी जाधव, आटपाडीचे माजी सरपंच रावसाहेब सागर, महात्मा फुले बहूउद्देशीय संस्थेचे बजीरंग फडतरे, सावंता माळी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब माळी, मापटेमळाचे सरपंच रघूनाथ माळी,भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे शासकीय सदस्य उत्तम बालटे, महात्मा फुले पतसंस्थेचे अध्यक्ष उद्योजक राजेश उर्फ रवीशेठ सातारकर, सांगोला अर्बन को ऑप बँकेचे अधिकारी प्रशांत बालटे, मापटेमळ्याचे युवा नेते प्रशांत माळी, काटेमळा येथील कबीर, माणगंगा सह कारखान्याचे संचालक बाबासाहेब माळी, म.फुले समता परीषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष मधुकर माळी आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ज्यांनी या थोर महापुरुषाच्या अर्धपुतळ्याची स्थापना केली की, ज्यायोगे महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल संबधितांचे अभिनंदन करण्यात आले व आभार मानण्यात आले.वास्तविक पाहता शहरात अशा प्रकारचे स्मारक उभा राहणे ही भावी पिढीवर समतावादी विचार रुजविणेसाठी गरजेचे होते. परंतू प्रशासकिय प्रक्रिया सुरु असलेने ते तुर्तास शक्य नव्हते. अशावेळी कांही अज्ञातांनी पूढे येऊन हे महत्कार्य केले. अशावेळी प्रशासनाने कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील काही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते प्रतिष्ठीत व्यापारी, उद्योजक आणि शेतकरी यांचेवर दबाव आणून पुतळा हटविण्यासाठी प्रशासनाकडून दबाव येत आहे.खरेतर या कुणाचाही पुतळा उभारणीत काहीही संबध नसताना समाजातील प्रतिष्ठेचा वापर करुन त्यांना बळीचा बकरा करुन त्यांच्यावर कारवाई करुन पुतळा हटविण्याचा प्रशासनाचा कावा फुले शाहू आंबेडकरी जनतेने ओळखावा व अशा प्रयत्नांना संघटित होऊन प्रखर विरोध करावा, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. वेळप्रसंगी आंदोलन, धरणे, मोर्चे व बंद पाळून प्रशासनाच्या मनमानी कारवाईचा धिक्कार करुन विरोध करण्याची मागणी बहुसंख्य युवकांनी केली. पुतळा संवर्धन व विकासासाठी रि.पा.ई तसेच अन्य फुले शाहू आंबेडकरवादी संघटना रस्त्यावरच्या लढाईत सहभागी होतील व त्यासाठी छातीचा कोट करतील अशी ग्वाही संबधितांनी दिली.
यावेळी सुमारे साडे तीनशे ते चारशे उत्साही तरुण सहभागी होते.लोकांनी उत्फूर्तपणे सहभाग नोंदवून व मत व्यक्त करुन निर्भीडपणाची साक्ष दिली.