जांभुळणीत राष्ट्रीय पक्षाला मिळाले जीवदान!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी :
आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथील गव्हळ शेत येथील श्रीरंग झंजे यांच्या विहिरीत पडलेल्या मोराला वनरक्षक ए.के.खापरकर व ओंकार माने यांच्यासह बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ यांच्या प्रयत्नातून जीवदान मिळाले.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महेश झंजे यांनी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ यांना फोनवरून गव्हळ शेत येथील श्रीरंग झंजे यांच्या विहिरीत मोर पडल्याचे सांगितले. मासाळ यांनी तात्काळ आटपाडी येथील वन विभागाचे वनरक्षक अशोक खापरकर यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.
वनरक्षक खापरकर व त्यांचे जांभुळणी भागातील सहकारी ओंकार माने यांनी तात्काळ जांभुळणी येथे येऊन ही बाब पाहिली.
हा मोर या विहिरीत मागील दोन दिवसांपासून पडला असल्याचे लक्षात आले. त्याची विहिरीतून सुटका करण्यासाठी विहिरीला पायऱ्या किंवा खाली उतरण्यासाठी वाट नव्हती. त्यामुळे दोरीच्या मदतीने विहिरीत उतरून या मोराला सुखरूपपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. याकामी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ, महेश झंजे, जयश्री झंजे, धनाजी थिटे, भिमराव मासाळ, पांडुरंग झंजे यांनी सहकार्य केले.