संतप्त नागरिकांनी सरपंचाच्या दालनासमोरच टाकला कचरा !

बिळूरमध्ये मनमानी कारभाराचा निषेध, आंदोलनाचा इशारा
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :

बिळूर ता. जत येथील ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी शुक्रवारी सरपंच व ग्रामसेवकाच्या दालनासमोर कचरा टाकत सुरु असलेल्या मनमानी कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला.
बिळूर ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक गावात आठवड्यातून एक-दोन दिवस येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाशेजारील विहिरीत पाणी आहे. मात्र ते सुद्धा पाणी वेळेत सोडले जात नाही. वेळेवर गावातील कचरा उचलला जात नसल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराला कंटाळून अखेर बिळूरमधील ग्रामस्थांनी ग्रामसेवक, सरपंच यांच्या दालनासमोर व कार्यालयासमोर तसेच रस्त्यावरही कचरा टाकत संताप व्यक्त केला.
ग्रामसेवक व सरपंच यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र आहे . पाच व सहा प्रभागात जाणीवपूर्वक पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. विहिरीत पाणी असूनसुद्धा ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना हाल सोसावे लागत असल्याची जोरदार चर्चा आहे.