अज्ञात हल्लेखोरांचा तिघांवर तलवारहल्ला !

अंत्यसंस्कार करून परत येताना लवंगी वनक्षेत्रात रात्री घडला प्रकार,तिघेही गंभीर जखमी !
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :

जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील तिघेजण नातेवाईकचे अंत्यसंस्कार करून गावी परत येत असताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील लवंगी वनक्षेत्र हद्दीत अज्ञात व्यक्तींनी जबर तलवार हल्ला केला. या हल्ल्यात जाडरबोबलाद येथील तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील विठ्ठल रामचंद्र बरुर, महादेव रामचंद्र बरूर व दयानंद मल्लप्पा बरूर हे तिघे मोटारसायकलने नातेवाईक वारल्याने नंदुरला अंत्यसंस्काराला गेले होते. अंत्यसंस्कार आटोपून रविवारी रात्री सात वाजता मोटारसायकलने परत गावी येत असताना लवंगी वनक्षेत्र हद्दीत अज्ञात हल्लेखोरांनी या तिघांवर जबर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून जखमींना तातडीने सांगली येथे हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. पण ग्रामीण रुग्णालय व परिसरात १०८ ही रुग्णवाहिका नव्हती. अखेर जत येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश मोटे यांनी रुग्णवाहिका रुग्णांना उपलब्ध करून दिली.पुढील उपचार सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहेत.