‘असा पार पडला’ सांगलीतील अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली:
सांगली येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करून संपन्न झाला.
सांगली येथे महानगरपालिकेने अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा खासदार शरद पवार यांचे हस्ते करण्याचा नियोजित कार्यक्रम आखला होता. मात्र भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक व आमदार गोपीचंद पडळकर आदींनी याबाबत विरोधाची भूमिका घेतली होती. अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा एका सामान्य मेंढपाळाच्या हस्ते व्हावा असा मनोदय व्यक्त करून आज याबाबतची तिथी निश्चित करण्यात आली होती. यादृष्टीने धनगर व बहुजन समाज बांधवामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर नियोजनबद्ध रणनीती आखण्यात आली होती.आज दुपारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या लोकार्पण सोहळ्यासाठी बहुजन बांधव उपस्थित झाले होते.
हा कार्यक्रम पार पडू नये म्हणून स्मारका भोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलिसांच्या फौजा तसेच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दुपारपर्यंत अनेक आहल्या प्रेमी
बहुजन बांधव सांगलीत दाखल होऊन हा सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन स्वीकारत होते. मुंगीलाही शिरकाव करण्यास जागा नसणेइतपत पोलीसफाट्याचा बंदोबस्त असताना या स्मारकाचा लोकार्पण सोहळा कशा पद्धतीने होईल, याकडे अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या होत्या. याबाबत गोपीचंद पडळकर यांनी लोकार्पण कोणत्या पद्धतीने पार पडणार याबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यामुळे लोकार्पण कसे होणार? हा प्रश्न होता.
मात्र सांगली येथील बहुजन बांधवांनी यशवंतराव होळकर चौकात आपली उपस्थिती दर्शवली. ड्रोनद्वारे स्मारकावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करून अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ढोल वादन करण्यात आले, तसेच नृत्यही सादर करण्यात आले
.