जांभुळणी येथे उद्यापासून एनएसएसचे विशेष श्रमसंस्कार शिबीर

कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची/आटपाडी:

आटपाडी येथील श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालयाचे जांभुळणी, ता. आटपाडी येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर २१ ते २७ मार्च, २०२२ या कालावधीत होणार आहे.
शिबिराचे उद्घाटन, जांभुळणीच्या सरपंच सौ. संगीता शिवराम मासाळ यांच्या हस्ते तर आटपाडीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील आहेत.
शिबिरामध्ये सात दिवस संस्कार, प्रबोधनात्मक कार्यक्रम, श्रमदान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या शिबीरात स्वयंसेवकाच्याकडून ग्रामस्वच्छता, परसबाग लागवड, शोष खड्डे व कंपोस्ट खत खड्डे खोदणे, वृक्षारोपण करणे, सर्वेक्षण, बांबू लागवड इत्यादी श्रमदान कार्यक्रम करण्यात येणार आहेत.
प्रबोधनात्मक कार्यक्रमात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन, वैद्यकीय शिबीर, महिला आरोग्य तपासणी शिबीर, भ्रष्टाचार निर्मूलन, देश मोठा की धर्म ? रक्तक्षयमुक्त भारत, विधी साक्षरता शिबीर या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक दिवशी सकाळी प्रबोधन फेरी काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, वैशाली कांबळे, रविकिरण जावीर, सचिन लवटे, डॉ. त्रिशाला भोसले, डॉ. मीनाक्षी गुरव, आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार, डॉ. विजय कुमार पाटील, प्रा. बालाजी वाघमोडे, आटपाडी विधितज्ञ शशिकांत शिंदे,
प्रा. संजय ठिगळे इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
या शिबिरामध्ये जांभूळणी येथील फ्रेंड सर्कल, फ्रेंड्स ग्रुप, नवतरुण गणेश मंडळ, जय भारत गणेश मंडळ, श्रीनाथ भजनी मंडळ, श्रीनाथ लेझीम मंडळ व जिल्हा परिषद मराठी शाळा याचा विशेष सहभाग असणार आहे.
शिबिरास प्रा. अभय जायभाये, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, प्रा. पोपट माळी, जिल्हा समन्वयक, सांगली, प्रा. तातोबा बदामे, विभागीय समन्वयक, तासगाव; शिवाजीराव पाटील, सचिव, श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आटपाडी; श्रीमती बाई माने, तहसीलदार, आटपाडी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, मनोज भोसले हे मान्यवर भेट देणार आहेत.
समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रा. संजय ठिगळे, माजी विद्यापीठ समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, कोल्हापूर उपस्थित राहणार आहेत. शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना समिती कार्यक्रम अधिकारी, प्रा. नागेश चंदनशिवे व प्रा. भारती देशमुखे, शिवराम मासाळ, अध्यक्ष, बळीराजा फाउंडेशन, जांभुळणी; गजानन पावले, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिरात कला व विज्ञान महाविद्यालय,आटपाडीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शंभर स्वयंसेवक व स्वयंसेविका सहभागी होणार आहेत.