प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /कडेपूर :
उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिलांचे सक्षमीकरण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रीनपॉवर शुगर,गोपूजच्या चेअरमन सौ.अपर्णाताई संग्राम देशमुख यांनी केले.
त्या जागतिक महिला दिनानिमित्त आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना व महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने ‘शाश्वत उद्यासाठी आजचे लैंगिक समानत्व- २०२२’ या कार्यक्रमांतर्गत ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावरती बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य बापूराव पवार होते. तर यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ॲड. अर्चना देशमुख, कडेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रुपाली यादव, सौ. देवयानी यादव-देशमुख, ॲड. रुपाली यादव उपस्थित होत्या. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य बापूराव पवार व राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक प्रा. सौ. संगिता पाटील यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
आज संपुर्ण जगामध्ये महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली दैदिप्यमान कामगिरी करून एक वेगळा ठसा उमटवला आहे, असे सांगून अपर्णा संग्रामभाऊ देशमुख पुढे म्हणाल्या की, आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. राष्ट्रपती पदापासून ते इतर सर्व प्रशासकीय सेवेबरोबरच सैन्यांमध्येदेखील महिला अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत आहेत. शासनही महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवत असते. प्रत्येकाने आपल्या घरातील महिलांना जास्तीत जास्त शिक्षण घेण्यासाठी प्रोस्ताहन द्यावे. घरातील महिला शिकली तर संपूर्ण घर प्रगतीपथावर नेण्याचे काम महिला करत असते, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी उच्चशिक्षण घेऊन स्वतः सक्षम बनावे, असेही त्या शेवटी म्हणाल्या.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य बापूराव पवार म्हणाले की, भारतामध्ये पहिल्यांदा महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महात्मा फुले यांनी कार्य केले. शिक्षणामुळेच महिलांचे सक्षमीकरण होईल म्हणून महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली, म्हणून भारतामध्ये महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान फार मोठे आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या समन्वयक प्रा. सौ. आशा हावळे यांनी केले. तर यावेळी पाहुण्याची ओळख राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक प्रा. सौ. संगिता पाटील यांनी करुन दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजया पवार हिने तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. चैताली देशमुख यांनी मानले. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. दिलीप पवार, प्रा. दत्तात्रय होनमाने, प्रा. राजेंद्र महानवर, प्रा. श्रीमती शिला इंगवले,प्रा. स्वाती चव्हाण तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद