शारीरिक व सामाजिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य महत्वाचे – प्रा. संजय ठिगळे

आटपाडी/ प्रतिनिधी:

कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता माणसाने काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः देशातील लॉक डाऊनची परिस्थिती लक्षात घेता तरुणाईने शारिरीक व सामाजिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचा विचार केला पाहिजे.प्रत्येक तरुणाने स्वतःच्या आरोग्या बरोबरच ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. असे मत शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम समन्वयक प्रा. संजय ठिगळे यांनी व्यक्त केले.
आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तरुणाई आणि आरोग्य ‘या विषयावर आयोजित केलेल्या एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम समन्वयक प्रा संजय ठिगळे यांचे ‘तरुणाई आणि आरोग्य’ या विषयावर बीजभाषण झाले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सदाशिव मोरे यांनी केले.
वेबिनारचे उद्घाटक प्राचार्य डॉ. विजय लोंढे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्याबरोबरच कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योध्याना मदत केली पाहिजे.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, देशातील तरुणाई हेच भारताचे सर्वात मोठे बलस्थान असून देशाच्या सर्वांगीन विकासासाठी तरुणाईने शाररिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य जोपासण्याची नितांत गरज आहे. ताण तणाव वाढल्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे त्यासाठी आनंदी व सकारात्मक रहा. विशेषतः समाजाशी आपली असणारी नाळ अधिक घट्ट करा त्यामुळे तुमचे सामाजिक आरोग्य धोक्यात येणार नाही. अलीकडच्या काळात तरुणाईमध्ये वाढत चाललेल्या फूड,मुड आणि धाबा संस्कृती मुळे आरोग्य बिघडले आहे. तरुणाईने निरोगी, देशप्रेमी, स्वावलंबी राहिले पाहिजे. देशातील तरूणाईने व्यसनमुक्ती,तणावमुक्ती , खिलाडूवृत्ती, देशभक्ती व सकारात्मक वृत्ती या पंचसूत्रीचा अंगीकार केला पाहिजे.
उपस्थितांचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. धनंजय लोहार यांनी मानले. संयोजन अंतर्गत गुणवत्ता विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी विभुते व संयोजन समिती सदस्य ङाॕ दिपक राजमाने प्रा .संदीप विभुते प्रा. युवराज जाधव ङाॕ किशोर जाधव प्रा .गणपतराव नांगरे प्रा .हणमंत सावंत.प्रा अनिल पाटील यांनी वेबिनार यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले . सदरच्या वेबिनारमध्ये देशातील विविध राज्यातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय वेबिनारमध्ये १० राज्यातील आणि ३ देशातील प्राध्यापक व स्वयंसेवकांचा सहभाग होता. एकूण उच्चांक नोदणी ७४० झाली.