कर्मचारी व सेवकांमुळेच राजे रामराव महाविद्यालयाची समाजात प्रतिष्ठा: प्राचार्य ढेकळे प्रयोगशाळा सहायक मारुती चव्हाण यांचा सेवानिवृत्तीनिमीत्त सत्कार

जत /प्रतिनिधी :
महाविद्यालयाच्या कर्मचारी व सेवकांमुळेच समाजात व शैक्षणिक क्षेत्रात राजे रामराव महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढत आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ व्ही एस ढेकळे यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागाकडे ४० वर्षे सेवा बजावणाऱ्या प्रयोगशाळा परिचर मारुती चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी प्रा श्रीमंत ठोंबरे, प्रा कुमार इंगळे, श्री मनु मोरे, राम शिंदे, गजानन कुंभार रियाज गंजिवाले, तुकाराम शिंगाडे, नामदेव खुडे यादी प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.


पुढे बोलताना ते म्हणाले की, मारुती चव्हाण हे बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा जत व मिरज शाखेवर गेली ४० वर्षे आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली आहे. पदार्थविज्ञान विभागाकडे अनेक नवनवीन प्रयोग करण्यात येतात. याचे नियोजन, मांडणी, मदत व प्रयोग करताना ते अत्यंत प्रामाणिकपणे ते करत असत. अशा संस्थेवर व महाविद्यालयावर मनापासून काम करणार्‍या व आपली सेवा विश्वासाने बजावणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्याची आम्हा गुरुदेव कार्यकर्त्यांना कायम आठवण येत राहिल.
या सत्कार समारंभाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन बी के पुजारी यांनी केले. तर शेवटी सर्वांचे आभार अकाऊंट मनु मोरे यांनी मानले. हा कार्यक्रम निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत व शासनाने केलेल्या वैयक्तीक व सामाजिक अंतर नियमांचे पालन करुन आयोजित करण्यात आला होता.