जत पश्चिम भागात तरसांच्या टोळीचा धुडगूस !

लोकांचे जगणे मुश्कील; बंदोबस्ताची मागणी, डफळापूर येथे रास्ता रोको आंदोलन
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत :

जत पश्चिम भागात गेले दोन महिने तरस या जंगली प्राण्यांच्या टोळीने धुडगूस घातला असून लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे.
तरसाच्या टोळीने बेंळुखी,बाज,अंकले या परिसरात माणसांसह जनावरांवर हल्ला केला आहे.यामध्ये एक कुत्रा ,घोड्याचे शिंगरु ठार झाले आहे. तसेच बाज येथील पुतळाबाई नामदेव वाघमोडे (वय ६५) या महिलेच्या पोटाला तरसाने चावा घेतला आहे.
बेंळुखीनजीक एक तरस मयत झाला आहे.याबाबत ठिकठिकाणी वनविभागाने पंचनामे केले आहेत. परंतु या तरसाच्या टोळीचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत.
संबंधित विभागाने तरसाच्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा व खोट्या गुन्ह्यात नाहक लोकांना अडकवण्यात येवू नये याबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डफळापूर बस स्टँडजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या रस्ता रोको आंदोलनास कॉग्रेस पक्षानेही पाठिंबा दिला. यावेळी किसान सभा राज्य कोषाध्यक्ष उमेश देशमुख, मार्केट कमिटी संचालक अभिजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, हणमंत कोळी, प्रशांत माने, दिपक कांबळे,गौस मकानदार, बाळासाहेब माने,बसवराज स्वामी, सतिश पांढरे, मुत्याप्पा जैनापूरे,अरुण कोळी, चंद्रकांत गोडबोले, गुलाब मुलाणी, जावेद मुजावर, नागरिक व मान्यवर या आंदोलनाला उपस्थित होते.