अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत :
जत येथील नियोजित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे जागेवर लवकरच विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बारा फुटांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे.
विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा जत शहरात असावा अशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांची खूप वर्षांपासूनची इच्छा होती.त्या दृष्टीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांकडून पुतळ्यासाठी निधीही जमा करण्यात आला आहे.
सद्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती बारा फुट उंचीचा पुतळा तयार असून हा पुतळा औरंगाबाद येथील समीर मडगलीकर यांनी बनविला आहे .
या पुतळ्याचे शिल्पकार समीर मडगलीकर यांचे पुर्वज हे कर्नाटकातील निपाणी येथील असून त्यांच्या पूर्वजापासून ते ही शिल्पकला जोपासत आहेत.सर्व देवदेवतांचे व महापुरूषांचे हुबेहुब पुतळे बनविण्याचा मडगलीकर यांचा हातखंडा आहे. एकदा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे निपाणीला कार्यकर्त्यांना मेळाव्यानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी निपाणी आले असता त्यांची भेट मडगलीकर यांच्या पूर्वजांशी झाली.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मडगलीकर यांची शिल्पकला पाहून त्यांच्या कलेची प्रशंसा केली व हा शिल्पकार निपाणीसारख्या ठिकाणी न राहता तो औरंगाबाद येथे मोठ्या शहरात राहून त्या ठिकाणी त्याने आपल्या कलेचे प्रदर्शन करावे यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मडगलीकर यांच्या पूर्वजांना औरंगाबाद येथे घेऊन गेले.त्यावेळेपासून मडगलीकर कुटुंबिय हे चांगल्याप्रकारे आपली शिल्पकला जोपासत आहेत .
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्राॅन्झ धातूमध्ये मडगलीकर यांनी बारा फुट उंचीचा भव्य व आकर्षक असा पुतळा बनविला आहे.या पुतळ्यासाठी एकूण १८ लाख रूपये खर्च आला आहे.
जत नगरपरिषदेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी आरक्षित केलेल्या खुल्या भूखंडावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्राॅन्झ धातूमध्ये तयार करण्यात आलेला बारा फुट उंचीचा पुतळा या ठिकाणी बसविणार असून सद्या या जागेच्या सभोवताली दगडी कंपाउंड बांधून पूर्ण झाले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा ज्या चबुत-यावर बसविण्यात येणार आहे त्या चबुत-याचे काम जवळ जवळ पूर्ण होत आले आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याकामी जतचे नगरसेवक व दलित पॅथरचे नेते भूपेंद्र कांबळे, ब.स.पा नेते अतुल कांबळे,रि.पा.इं.जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे, अशोक कांबळे व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर जत येथील आंबेडकर अनुयायांनी मोठे योगदान दिले आहे.
या जागेची पुर्णपणे स्वच्छता करून उद्यानाचा विकास आराखडा तयार करून या ठिकाणी विविध प्रकारच्या शोभीवंत वृक्षांची लागवड करण्यात येणार असून अबालवृद्धांसाठी या ठिकाणी सर्व सुविधा तयार करण्यात येणार आहेत.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान उभारणीसाठी साठ ते सत्तर लाख रूपये खर्च येणार आहे.
यामुळे जत शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बाराफुटी ब्राॅन्झ धातूमध्ये बनवलेला पुतळा बसविल्याने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांचे व जतशहरवासियांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दि.१४ एप्रिल रोजी साजरी करण्यात येत असून जयंतीपूर्वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा औरंगाबाद येथून आणून त्याची सवाद्य जत शहरातून भव्य मिरवणूक काढून तो पुतळा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये बसविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद