बळीराजा फौंडेशन व कोरो इंडीयाकडून समन्यायी पाण्याच्या लढ्याचा श्रीगणेशा !

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / आटपाडी :
बळीराजा फौंडेशन जांभुळणी व कोरो इंडीया (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक सहभागातून पाणी व्यवस्थापन जाणीव जागृती कार्यक्राम जांभुळणी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला.
समता फौंडेशन मंगळवेढाचे अध्यक्ष श्रीनिवास गंगणे,ग्रामीण विकास संस्था कोसारी जतचे अध्यक्ष विवेक ठेंगले , गोरे , नवनाथ व कोरो इंडीयाचे सचिन लवटे , जांभुळणीच्या ग्रामपोलीस पाटील सौ. अनिता पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव मासाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमात प्रथम जांभुळणी गावातील निवृत्त जवान स्व.मोहन गरदडे यांना श्रद्धांजली वाहिली गेली. प्रास्ताविक व स्वागत बळीराजा फौंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ यांनी केले.प्रास्ताविकामध्ये गावातील व परिसरातील पाण्याची सध्याची परिस्थिती व गतकाळातील परिस्थिती व भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या मांडण्यात आल्या.त्यानंतर सचिन लवटे यांनी मार्गदर्शन करतांना बळीराजा फौंडेशन व कोरो इंडीया यांची पुढील दोन वर्षांत गावासोबत ह्या संस्था कोणकोणत्या भूमिका पार पाडतील व गावातील ग्रामस्थ कोणत्या भूमिका वटवतील याचा ऊहापोह झाला.तद्नंतर भूगर्भातील पाणीसाठा याची फिल्म दाखवून ग्रामस्थांच्या मनात विचारचक्र सुरू केले आणी पाणी ही वैयक्तिक मालमत्ता नसून ती संपुर्ण गावांतील जीवजंतूसह ,प्रत्येक व्यक्तीची असून ,ती जशी जमीनदाराची आहे, तशी भूमीहिनांचीदेखील आहे हे समजून घेतले.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील परतवडी गावची गशोगाथा असलेली फिल्म दाखवली आणि तेथील लोकांची पाण्यासाठी झालेली भटकंती, महिलांनी अंघोळीविना काढलेला आठवडा असो अथवा विहीरीत उतरून काढलेले पाणी हे बघून मन हेलावून गेले. गावांतील लोकांनी मनात घेतल्यावर काय क्रांती घडू शकते. (गाव करील ते रावं काय करील) हे दाखवून दिले.
ज्या गावात पक्षांना पिण्यासाठी पाणी नव्हते तिथे शेतात पिके अगदी हिरवीगार डौलदार दिसल्याने तेथील शेतकरी समाधानी दिसला.त्यानंतर दाखविलेली फिल्म म्हणजे प्रत्येक मनात ऊर्जा निर्माण करून देते. रस्त्यावर पडलेले झाड, धो-धो पाऊस पडतोय, लोकं शांत, कोण हाॅर्न वाजवतोय, राजकीय पुढारी येतात त्यांना प्रशासन म्हणा किंवा पोलीस रस्यापलीकडे पाठवून त्याची सोय करून देतात, पुन्हा उभ्या पावसात पोलीस अधिकारी झोपी जातात, तेव्हा नागरीकांना राग येताना दिसतोय, त्याचं वेळी एक शाळकरी विद्यार्थी आपल्या दप्तरासह भल्या मोठ्या झाडाला हालवून ,उचलून दूर करण्याचा प्रयत्न करतांना दिसतोय. तेव्हा जे देशाचे नागरिक म्हणून मिरवतात ते हासताना दिसले. त्यांना त्या विद्यार्थीच्या मदतीला दुसरी लहान मुलगी येते, तिथून लोंकाच्यामध्ये उर्जा निर्माण होते, एकास एक मदत करत अनेकजण झाड बाजूला करण्याच्या चळवळीत सहभागी होतात, आणि ते झाड सहज बाजूला करून मार्ग मोकळा करून घेतात. म्हणजेच एकीचे बळ मिळते फळ याप्रमाणे मौजे परतवडी गावास फळ मिळाले आहे. आता आपली बारी आहे.. आता कोरो आपल्या सोबत असल्याने आपण नक्कीच समतेची लढाई जिंकून समन्यायी पाणी व्यवस्थापन करूयात. हा कार्यक्रम अगदी कमी ५० ते ६० लोकांमध्ये झाला असला तरी बळीराजा फौंडेशनच्या माध्यमांतून सौ.जयश्रीताई झंजे यांनी छान नियोजन केल्याने आनंद वाटला.अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन लवटे यांनी अतिशय उत्कृष्ट केले व सौ.जयश्रीताई झंजे यांनी आभार मानले.