सासूची हत्या करणाऱ्या जावयाला ठोकल्या बेड्या पुण्याला पलायन; २४ तासाच्या आत घेतले ताब्यात

रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदुरबाजार:

चांदुर बाजार तालुक्यातील ग्राम टाकरखेडा पूर्णा येथे सासूची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या जावयाला २४ तासाच्या आत पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी भर दुपारी सासरवाडीत येऊन त्याने सासु व पत्नीवर शुल्लक कारणावरून कुर्‍हाडीने हल्ला केला होता. यात सासूचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीररीत्या जखमी झाली होती.
दिनेश भानुदास भोरखडे(वय ३० रा.पेठ ईतबारपूर ता.दर्यापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. टाकरखेडा पूर्णा येथे शुक्रवारी आलेल्या दिनेशनचा दुपारी दोनच्या सुमारास पत्नी स्नेहल(वय २५) तिच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. सासू पद्मा उर्फ रख्माबाई विनायकराव इंगळे(वय ४५) यांनी मध्यस्थीचा प्रयत्न करताच त्यांना दिनेशने ठार केले. पत्नी स्नेहल सुद्धा गंभीररित्या जखमी झाली. घटनास्थळावरून दिनेशने पळ काढला होता. पत्नी स्नेहलच्या तक्रारीवरून आसेगाव पूर्णा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
पुण्यात उतरतात अटक
ठाणेदार किशोर तावडे यांनी आरोपीला तातडीने पकडण्यासाठी एक पथक रवाना केले होते. या पथकाने दिनेशचा माग काढला. तो पुणे येथे ट्रॅव्हल्सने निघाल्याचे समजतात, पुणे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. शनिवारी सकाळी पुणे येथे ट्रॅव्हल्समधून उतरताना त्याला ताब्यात घेण्यात आले.