संख येथे शेतमजुराचे घर जळाले; मानव मित्र संघटनेकडून मदत

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / जत :

जत तालुक्यातील संख येथील बोराळवस्तीवर राहणारे शेतमजूर महादेव मुटेकर यांच्या छप्परवजा घराला आग लागून नुकसान झाले होते. मुटेकर कुटूंबियांचा संसार उघड्यावर पडला होता. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना त्यांच्या मदतीला धावून जात त्यांना मदतीचा हात दिला.
संख येथील बोराळ वस्तीवरील राहणारे शेतमजूर महादेव मुटेकर यांच्या छप्पर वजा घराला रविवारी दुपारी अचानक आग लागली होती. अचानक लागलेल्या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मुटेकर कुटूंबियांचे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीमध्ये घरातील सोने, कपडे, संसारोपयोगी साहित्य व धान्य जळून खाक झाले. अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे मुटेकर कुटुंबीयांचा संसार उघडयावर आला.
या घटनेची माहिती संख येथील श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या सदस्यांनी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांना दिली. बाबांनी मुटेकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर देत मदतीचा हात दिला.
यावेळी अनिलकुमार बिराजदार, महेश बिराजदार, ननवरे उटगी, राजेंद्र कुंभार, विठ्ठल कुंभार, चनाप्पा आवटी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, जत तालुक्यामधील वाढत्या आगीच्या घटना चिंताजनक आहेत. अशा घटना घडल्यानंतर कुटुंब उघड्यावर पडते तेव्हा समाजातील दानशूर व्यक्तींनी, प्रशासनाने त्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही . मुटेकर कुटुंबियांना मदतीची गरज असून त्यांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले.