आटपाडी येथे लोकअदालतीस अभूतपूर्व प्रतिसाद!

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी येथे दि. ११ डिसेंबर रोजी झालेल्या लोकअदालतीस योग्य आणि नेटक्या नियोजनामुळे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
या लोकअदालतमध्ये न्यायालयातील ७७ प्रलंबित प्रकरणे तर ४९१ वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. या सर्व मिटलेल्या प्रकरणांच्या मधून १ कोटी ६८ लाख ३० हजार ८८७ रुपये एवढी मोठी रक्कम वसूल झाल्याने लोकअदालत यशस्वी झाल्याचे दिसून आले.
आपली न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे मिटल्याने तर वादपूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच मिटल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारच्या समाधानाचे भाव दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर खूप दिवसांनी न्यायालयाचा परिसर गजबजून गेलेला दिसून आला.
तर लोक अदालतच्या निमित्ताने आपले मित्र,संबंधीत नातेवाईक यांची भेट झाल्याने आपुलकीने लोक एकमेकांची चौकशी करताना, विचारपूस करताना दिसून आले. तर काहींनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
न्यायालयाच्या दालनामध्ये पंचायत समिती आटपाडी यांचे वतीने मंडप उभारून त्यामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. लोकअदालतच्या सुरुवातीस वादपूर्व प्रकरणांच्या मधील रकमांचा भरणा केलेल्या नागरिकांना दिवाणी न्यायाधीश विनायक पाटील साहेब व सहदिवाणी न्यायाधीश अनंत टेंगसे साहेब यांच्या हस्ते पावत्या देऊन लोकअदालतची सुरुवात करण्यात आली.
लोकअदालत प्रसंगी दिवाणी न्यायाधीश विनायक पाटील सो तसेच सह दिवाणी न्यायाधीश अनंत टेंगसे सो यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच पॅनलवरील वकील म्हणून अॅड. लतिका माळी, अॅड. महेश मोरे तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अरविंद चांडवले व प्रा. संजय काळेल यांनी काम पाहिले.
याप्रसंगी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज भोसले,तसेच विस्ताराधिकारी एस. एम. बाड, वकील संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच तालुक्यातील सर्व बँक पतसंस्था यांचे अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व न्यायालयीन कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.
लोकअदालतचे सर्व नियोजन तालुका विधी सेवा समिती आटपाडीचे व्यवस्थापक सलमान शेख यांनी पाहिले.