येळवी येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ!
आत्मदहनाचा इशारा;सोमवारी सांगलीत बोंबाबोब आंदोलन
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज/जत :
नंदेश्वर (ता.मंगळवेढा )येथील बाळकृष्ण डेअरी प्रायव्हेट लिमिटेड नंदेश्वर या दूध संस्थेने सभासदांना गाई घेऊन देतो म्हणून सह्या घेऊन व कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर आरबीएल बँक (पूर्वीची रत्नाकर बँक )सांगली येथील बँकेकडून परस्पर संगनमताने कर्ज उचल घेतली आहे. सदर बँकेने नुकतेच सभासदांना कर्ज भरणा करावी या संबंधित नोटीस दिली आहे.यामुळे सभासदात खळबळ उडाली आहे. कोणतेही कर्ज न घेता बँकेने नोटीस आल्याने सभासदांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबतचे निवेदन दूध उत्पादकांनी जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांना दिले आहेत.गेडाम यांनी लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.या निवेदनावर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.जिल्हा पोलिस प्रमुख यांनी लक्ष घातल्याने जत तालुक्यासह मंगळवेढ्यातील घोटाळा उघडकीस येणार आहे.
जिल्हा पोलिसप्रमुख गेडाम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नंदेश्वर (ता. मंगळवेढा )येथील बाळकृष्ण दूध संस्थेचे दादा रामा गरंडे, बाळासो दादासो गरंडे, तातोबा खंडू गोरे, आप्पा बाबा गरंडे या दूध संस्थेच्या चालकांनी दूध उत्पादक सभासदांची घोर निराशा व फसवणूक केली आहे.दीड महिन्यापूर्वी येळवी (ता. जत) येथील 13 दूध उत्पादक सभासदांना लोन रिकॉल नोटीस आरबीएल बँक मार्फत पाठवण्यात आली आहे.कोणतेही कर्ज न घेता बँकेचे नोटीस आल्याने संस्थेचे सर्वेसर्वा बाळासो गरंडे यांना काही सभासदांना विचारणा केली.त्यांनी सांगितले की, आम्ही यातील काही कर्ज भरले आहेत. उर्वरित १४ नोव्हेंबर रोजी भरू असे सांगितले होते.वेळोवेळी अशा मुदती देत राहिले आहेत.फसवणूक लक्षात येताच सभासदांनी पोलीस विभाग व न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर सभासदांनी सांगितले की, आम्हाला जर्सी गाई घेऊन देतो, म्हणून आमच्याकडन कागदपत्र घेण्यात आली व आमच्याकडे अगोदर आपण पशुपालन करत आहात का? अगोदर आपल्याकडे जर्सी गाय असेल तरच आपणास गाई मिळेल असे सांगून सन २०१३-१४ मध्ये आपल्याकडल्या अगोदरच्या गाई दाखवून आपल्या नावे कर्ज दिले जाईल असे सांगितले होते.परंतु असे न करता बाळकृष्ण दूध डेअरी संस्थेने परस्पर बँकेकडून सभासदांच्या नावे संगनमताने कर्ज उचलली आहेत.सभासदांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
बाळकृष्ण डेअरीने वेळेत सदर कर्जाचा परतावा न केल्याने सभासदांना याबाबतची नोटीस आली आहे. तसेच सभासदांना त्यांचे सी.बी.एल खराब झाले आहेत. सी.बी.एल खराब झाल्यामुळे कोणतेही व्यवहार करू शकत नाहीत. सभासदांची मोठी गैरसोय व फसवणूक झाली आहे.त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्याकडे धाव घेतली आहे.त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सभासदांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहणार :जिल्हाअध्यक्ष महेश खराडे
मंगळवेढा तालुक्यातील एका संस्थेने सभासदांच्या जत व मंगळवेढा तालुक्यातील शेकडो सभासदांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांनी त्यांना न्याय देण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रमुख यांना भेटून फसवणूक केल्याची व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी करणार आहे. योग्य कार्यवाही न झाल्यास येत्या सोमवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोब आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन दरम्यान कोणतीही घटना घडल्यास संबधित दूध संस्थेची जबाबदारी असेल.न्याय मिळेपर्यंत लढा सूरूच राहणार आहे.तसेच अशी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन खराडे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन