पाण्याचा प्रश्न होता गंभीर,तिथे नगरसेविका वनिताताई बनल्या खंबीर !

खराब पाईपलाईन बदलण्यासाठी खेचला निधी !
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

जत शहरातील प्रभाग क्रमांक एक विठ्ठलनगर मधील नगरसेविका सौ.वनिता साळे यांनी प्रभागातील मुख्य जलवाहिनी बदलण्यासंदर्भात जत नगरपरिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले आहे.
पाणी पुरवठ्याची पाईपलाईन खराब झालेली असून याठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.तरी पाणीपुरवठ्याची पाईप लाईन दुरुस्तीबाबत सौ.साळे यांनी वारंवार मागणी केली होती. प्रभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याची लाईनदेखील नाही. त्यामुळे प्रभागातील नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहे. या ठिकाणची पाईपलाईन बदलण्यात यावी यासंदर्भात लेखी निवेदन त्यांनी नगरपरिषदेस दिले होते.
त्यांनी संपूर्ण विठ्ठलनगर परिसरातील पाईपलाईन बदलण्याचा प्रस्ताव नगरपालिकेकडे सादर केला होता. त्यापैकी व्यंकटेश सोसायटी, यशवंत सोसायटी, गोब्बी हायस्कूल ते तांबोळी घर, रुपेश कांबळे ते शेगाव रस्ता, संजय कोळी ते शेगाव रस्ता, नवीन पाईप लाईन करणे या कामासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे जास्तीत जास्त निधी प्रभागात आणण्यास सौ.साळे यांना यश आले आहे. प्रभागातील पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे ही बाब त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी जत नगर परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामांना व त्यांच्या परिश्रमाला यश आले आहे.या कामासाठी सुमारे तब्बल ३१ लाख रुपयांचे नवीन पाईपलाईनचे काम करणे विठ्ठलनगर प्रभाग क्रमांक एक येथे युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच प्रभागातील आणखी राहिलेली कामे, वाड्या-वस्त्यावरील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे प्राधान्य देऊन प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा मानस आहे.या नवीन पाईप लाईनच्या कामामुळे परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.या कामाबाबत नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.